मुक्तपीठ टीम
पेगॅसस सॉफ्टवेअरच्या मदतीने अनेक पत्रकारांचे फोन हॅक करण्यात आले आहेत. शुक्रवारी फ्रेंचच्या दोन पत्रकारांचे फोन पेगॅसस सॉफ्टवेअरच्या मदतीने हॅक करण्यात आले. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी सरकारवर निशाणा साधत पेगॅसस प्रकरणाला राफेल तपासाशी जोडले आहे.
पी. चिदंबरम यांनी ट्विट केले की, “मीडियापार्ट हे एकमेव न्यूज चॅनेल आहे ज्यांनी राफेल प्रकरणाचा तपास फ्रान्समध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितलं होतं. भारतात झालेल्या पेगॅससच्या गैरवापराचा छडा सरकार केव्हा लावणार?” असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इस्रायलचे पंतप्रधान नेफ्ताली बेटेन यांच्यात पेगॅसस हेरगिरीबाबत चर्चा झाली होती. पी. चिदंबरम यांनी सांगितले की, भारत असा एकमेव देश आहे ज्यामध्ये सरकार पेगॅसससारख्या बड्या प्रकरणात अद्याप लक्ष घालत नाहीय. मोरोक्कोच्या सुरक्षा यंत्रणाच्या माध्यमातून फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी इस्रायलच्या पंतप्रधानांना फोन केला होता. २२ जुलै रोजी करण्यात आलेल्या या फोनमध्ये त्यांनी बेनेटला पेगॅसस प्रकरण गांभिर्याने घेण्यात येणार असल्याचं सांगितले.
माजी अर्थमंत्र्यांनी ट्विट केले की, ‘फ्रेंच राष्ट्रपतींनी इस्रायलच्या पंतप्रधानांना फोन करुन पेगॅससच्या गैरवापराची संपूर्ण माहिती सांगण्यात आली. पेगॅससच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात येत असल्याचं भारत सरकारला माहित असल्याने भारत सरकार पेगॅसस प्रकरणात लक्ष घालत नाही. त्यामुळे त्यांना इस्रायल किंवा इतर ‘एनएसओ’कडून माहिती घेणं गरजेचं वाटत नाही. पेगॅसस प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सरकारने संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती. किंवा या प्रकरणाची चौकशी न्यायाधीशांकडून करण्यात यावी, असं त्यांनी सांगितलं. तसंच पंतप्रधानांनी पेगॅससद्वारे हेरगिरी करण्यात आली आहे की नाही याची माहिती देण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती.