मुक्तपीठ टीम
नर्मदा जीवनशाळांचा बालमेळावा कार्यक्रमाचा नुकताच मेधाताईंसह अन्य मान्यवरांच्या हस्ते समारोप झाला. या बालमेळ्यात नर्मदा खोऱ्यातील नर्मदा जीवन शाळेचे ६०० विद्यार्थी आणि जवळजवळ तेवढेच आदिवासी गावकरी, पालक, शिक्षक आणि वेगवेगळ्या राज्यातून, जिल्ह्यातील आलेले स्नेही सहभागी झाले होते. शेवटच्या दिवशी कबड्डी, खो-खो हो या संगीत खुर्ची,स्मरणशक्ती सारख्या स्पर्धेने कार्यक्रमात एकदम रंगत आली.
धडगाव येथील शोभा वाघ छात्रालयाच्या मुलांनी नर्मदा नवनिर्माण अभियानावर एक नाटक सादर केले. मध्यप्रदेशातील खाऱ्या भादलमधील नर्मदा जीवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी अमृता देवीच्या नेतृत्वाखाली बिष्णोई समाजाने जंगल वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यावरील नाटक सादर केले.
या बालमेळाव्यात बऱ्याच जणांचा सत्कार झाला. पण त्यातील एक विशेष सत्कार होता. सरकारी शिक्षक असूनही सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे काही शिक्षक सहकारी आपल्या वेतनातील काही हिस्सा शाळेतील सामाजिक योगदानात खर्च करत असतात. त्यांच्यापैकी एक म्हणजे सपकाळे गुरुजी. आधी कलमाडी व आता थेवापाणी गावात कार्यरत शिक्षक सपकाळे गुरुजींचा सत्कार करण्यात आला. नर्मदा आंदोलनातील पूर्णवेळ कार्यकर्ता महेश शर्मा आता बिलासपूरमध्ये जैविक शेती करीत आहेत. त्यांच्याकडे जवळपास त्याच्याकडे तांदळाच्या ४०० देशी वाणांचे बीज आहेत. ते आता या देशी बीजांचा प्रचार प्रसार नर्मदा खोऱ्यातही करणार आहेत.
तसेच जीवन शाळांमध्ये शिकून आता क्रीडा प्रबोधिनीत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाव कमवणाऱ्या संदीप पाडवी, अमृत पावरा, रतन पाडवी यांचा सत्कार करण्यात आला. चिखलीच्या गावकऱ्यांनी मुलांसाठी, पाहुण्यांसाठी राहण्याची व्यवस्था केली. बालमेळा यशस्वी करण्यासाठी मेहनतही घेतली, त्यांचाही सत्कार करण्यात आला.
लॉकडाऊनमध्ये सर्व शासकीय शाळा बंद होत्या तेव्हा आपल्या गावातील लहान मुलामुलींना शिक्षण देणाऱ्या गाव निर्माण शाळा, जीवन नगर व गोपाळपूरच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यांना थोडे मानधन व गावात वाचनालय चालवण्यासाठी कपाट व पुस्तक देण्यात आली.
या बालमेळाव्यात आलेल्या नर्मदा आंदोलन समर्थकांनी मुंबई जवळ रायगड, पुणे,औरंगाबाद, भुसावळ व म.प्र. मध्ये निमाळ येथे असा बालमेळा घेण्याचे नक्की केले आहे. याच मेळाव्यात कविता भागवत यांनी लिहिलेले जीवनशाळा मार्गदर्शिका ह्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
सर्व समर्थक साथी ज्यात औरंगाबादहून आलेले माजी जिल्हा न्यायाधीश गोरमे, रामबाबू अग्रवाल, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सई तांबे, शैला सावंत, तारा जाधव, तारा मराठे, शहादा येथील विचारधारा फाउंडेशनचे तात्याजी पवार, फुले आंबेडकर स्टडी सर्कलचे अनिल कुंवर, माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी, शहादा काँग्रेसचे डॉ सुरेश नाईक, जळगाव येथून आलेले गटविकास अधिकारी सुभाष जाधव, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक युवराज घटकल, दिल्लीहून आलेले जन आंदोलनाचे मधुरेश कुमार, घर बचाओ-घर बचाओ आंदोलनाचे राम भाई व पूनम कनोजिया तसेच नर्मदा बचाओ आंदोलनाचे कार्यकर्ते व गावप्रतिनिधी आणि सेंच्युरी मिलचे शाम भदाणे व सहकारी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत या साऱ्या मान्यवरांच्या हस्ते खो-खो, कबड्डी, वक्तृत्व, निबंध, चित्रकला, धनुष्यबाण, रनिंग,गोणपाट उडी, उंच उडी, नाटक, गीत, नृत्य यात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना उपयोगी येतील अशी व शाळेला उपयोगी येतील अशा बक्षिसे वितरणाचा कार्यक्रम झाला.
पाहा व्हिडीओ: