मुक्तपीठ टीम
गुरुवारी म्हाडाच्या घरांची संधी हुकली त्यांच्यासाठी आता म्हाडाच्या कोकण मंडळाकडून पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. पुढच्या वर्षी मार्चमध्ये मंडळाकडून सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमधील घरांचा समावेश असेल. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८ हजार ९८४ घरांसाठी गुरुवारी सोडत काढण्यात आली.
मार्च २०२२मध्ये कोकण मंडळाकडून पुन्हा संधी
- आता मंडळाने मार्च २०२२ मध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.
- या सोडतीत म्हाडा गृहप्रकल्पातील घरांसह पंतप्रधान आवास योजनेतील विजेत्यांकडून परत (सरेंडर) आलेली घरे, प्रतिसाद न मिळालेली घरे समाविष्ट करण्यात येणार आहेत.
- ही घरे ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमधील असतील.
‘गाव तिथे म्हाडा’ अशी योजना
- ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात गुरुवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सोडतीस आरंभ झाला.
- घरांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आता ‘गाव तिथे म्हाडा’ अशी योजना हाती घेण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
- पंतप्रधान आवास योजना, २० टक्क्यातील घरे आणि म्हाडा गृहप्रकल्पातील घरे अशा प्रकारच्या घरांचा सोडतीत समावेश होता.
सोडतीतील दोन हजारांपेक्षा जास्त घरे तयार!
- ८९८४ घरांच्या सोडतीत आरक्षित २० टक्क्यातील घरे तयार असून त्यांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेले आहे.
- म्हाडा प्रकल्पातील काही घरांनाही भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे.
- त्यामुळे आता लवकरच सर्वप्रथम २० टक्क्यातील विजेत्यांना प्रथम सूचना पत्र पाठवत कागदपत्रे जमा करून घेतली जाणार आहेत.
- त्यानंतर पात्रता निश्चित करत पात्र विजेत्यांना घरांचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
- इतक्या संख्येने अर्ज आले असताना त्यातून आपल्याला घर मिळणे ही मोठी आनंदाची बाब आहे.