मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारच्या सर्व विभागांची आणि सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांची त्यांच्या वापरासाठीची देशभरातील सर्व रुग्णालयं सामान्यांसाठीही खुली करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी केंद्र सरकारकडे तशी मागणीही केली आहे. मुंबई परिसरात अशी अनेक रुग्णालयं आहेत. त्यातील पनवेल परिसरातील ओएनजीसी, बीओसीची दोन मोठी रुग्णालयं तर गेली काही वर्षे बंद पडली आहेत. तीही त्या संस्थाकडे बसून असलेल्या मनुष्यबळाचा वापर करत कार्यरत करता येतील, अशीही सूचना वैद्यकीय क्षेत्रातील माहितगारांकडून पुढे आली आहे.
अॅड. वर्षा देशपांडे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात उपलब्ध आरोग्य सुविधांच्या कमाल उपयोगाचा मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी विनंती केली की, ईएसआयसी, सीएचएस, रेल्वे, संरक्षण खाते, बीएआरसी, ओएनजीसी, सेल इत्यादी रुग्णालये जी प्रामुख्याने केवळ नोंदणीकृत लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आहेत, त्यांना पुढच्या १८० दिवसांकरिता सर्व नागरिकांसाठी खुले करावे. जेणेकरून ती रुग्णालयं कोरोना साथीच्या या संकटकाळात त्यांची जास्तीत जास्त क्षमता उपयोगात आणू शकतील.
त्या पुढे म्हणाल्या की, सध्याची कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र आहे. आणि सरकारकडून केले जाणारे प्रयत्न हे अपुरे पडत आहेत. म्हणूनच त्यांनी सुचवले की, सर्व सरकारी विभागांच्या रुग्णालयांचा, आरोग्य केंद्रांचा आणि अन्य आरोग्य सुविधांचा उपयोग सर्वांसाठी करायचा सरसकट आदेश केंद्र सरकारने काढला तर खूप फायदा होईल. त्यामुळे सध्या दुर्लक्षित असल्याने उपयोगात नसलेल्या सुविधांचा वापर होईल. सध्याच्या वापरातील आरोग्य सुविधांवरील कमालीचा ताण बराचसा कमी होऊ शकेल.
अॅड. वर्षा देशपांडे या गांधी समाजसेवक आहेत ज्या
राष्ट्रीय तपासणी व देखरेख समितीच्या पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय सरकारच्या सदस्य आहेत. त्या राष्ट्रीय महिला वकीलांच्या पॅनलमधील सदस्य आहेत. कोरोना महामारीत त्या लेक लाडकी अभियान या स्वयंसेवी संस्थेमार्फत फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करत आहे. तसेच या महामारीच्या काळात लोकांना बेड, आर्थिक सहाय्य आणि शासकीय योजनांद्वारे मदत करत आहेत.