मुक्तपीठ टीम
देशभरात कोरोना पासून बचावासाठी सुरक्षा कवच म्हणून लसींकडेच पाहिले जात आहे. देशात आज कोट्यवधींचे लसीकरण करण्यात आले आहे. ज्या लोकांनी लस घेतली त्यापैकी १० हजारांमागे फक्त २ ते ४ लोकांमध्येच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. हे प्रमाण खूपच अत्यल्प असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे.
आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी लसींचे महत्त्व ठासून सांगितले. ते म्हणाले की ज्यांना लसींचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, त्यांच्यातील संसंर्गाविषयीच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की अगदी अत्यल्प लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
आयसीएमआरची आकडेवारी काय सांगते?
- कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसनंतर आतापर्यंत ०.०४ टक्के लोकांना कोरोनाची बाधा
- कोव्हिशिल्डच्या दुसर्या डोसनंतर ०.०३ टक्के लोकांना कोरोनाची बाधा
- कोव्हिशिल्ड लसीचे ११ कोटी ६ लाख डोस देण्यात आले आहेत. १० कोटी लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे, त्यापैकी १७१४५, म्हणजे १० हजारामागे २ लोकांना लोकांना संसर्ग झाला.
- १ कोटी ५७ लाख ३२ हजार ७५४ लोकांनी या लसीचा दुसरा डोस घेतला व त्यापैकी फक्त ५ हजार १४ (०.०३ टक्के) लोक कोरोनाबाधित झाले. अशा प्रकारे १० हजारांमागे २ ते ४ लोकांमध्ये ‘ब्रेकथ्रू इन्फेक्शन’ घडून आले आहे.
भार्गव यांच्यामते हे प्रमाण अत्यल्प आहे. यापैकी बहुतांश लोक प्रामुख्याने व्यवयासाच्या स्वरूपामुळे जास्त धोका असलेले आरोग्य कर्मचारी होते, असे भार्गव यांनी सांगितले.
लसीकरणानंतरही घ्या काळजी!
- लसीकरणानंतरही लोकांनी मास्क वापरावे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी देत असतात.
- आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये लसीकरणानंतर कोरोना विषाणूचे आणि मृत्यूचे प्रमाण हे कमी आहे, लसीकरण हे खूप महत्वाचे आहे.