मुक्तपीठ टीम
महिलांनो……. ऑनलाइन शॉपिंग करता तर सावधान, बोगस वेबसाइटच्या माध्यमातून तुमची फसवणुक होण्याची शक्यता आहे. “शॉपि डॉट कॉम” या नावाने बोगस वेबसाइट बनवून देशभरातील २२ हजार महिलांना सुमारे ७० लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आशिष अहिर या मुख्य आरोपीस गुजरातच्या सुरत शहरातून मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या ऑनलाइनचा जमाना आहे, त्यामुळे अनेकजण ऑनलाइन ऑर्डर करण्यावर भर देतात, त्याचाच काही सायबर भामट्यांनी फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर “Shopiiee.com” या वेबसाइटने स्वत:ची जाहिरात केली होती. त्यातून या वेबसाइटची प्रचंड लोकप्रियता वाढली. त्यामुळे देशभरातून अनेक महिलांनी या वेबसाइटवर ड्रेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, गृहपयोगी वस्तू मागवल्या होत्या. वस्तू मागवताना आधी पेमेंट करणे गरजे असल्याने त्यांनी पेमेंटही केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत संबंधित अधिकार्यांकडून त्यांच्या मागवलेल्या वस्तूंच्या डिलीव्हरीची पूर्तता झाली नव्हती, अशा अनेक तक्रारी पोलिसांत येऊ लागले होत्या. यासंदर्भात काही तक्रारी सायबर सेल पोलिसांना प्राप्त झाल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. प्राथमिक तपासात पोलिसांना या वेबसाइटवरुन देशभरातील २२ हजार महिलांनी ऑनलाइन ऑर्डर देताना सुमारे ७० लाख रुपयांचे पेमेंट केल्याचे उघडकीस आले होते, मात्र पेमेंट करुनही त्यापैकी एकाही महिलेला त्यांच्या ऑर्डरची डिलीव्हरी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सायबर गुन्हे शाखेच्या तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध ४१९, ४२० भादवी सहकलम ६६ क, ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
तपासादरम्यान संबंधित आरोपी गुजरातच्या सुरत शहरात वास्तव्यास असून त्यानेच ही बोगस वेबसाइट बनवून अनेक महिलांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते, त्यानंतर या पथकाने सुरत शहरातून आशिष अहिर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने “Shopiiee.com” नावाचे बोगस वेबसाइट बनविल्याची कबुली दिली. आशिष हा संगणकतंज्ञ असून त्याने विदेशातून शिक्षण घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल, तीन सिमकार्ड, आयसीआयसीआय बँकेचे धनादेश जप्त केले आहेत. त्याच्या चौकशीत त्याने या वेबसाइटसह इतरही काही बोगस वेबसाइट तयार केल्याचे सांगितले. आतापर्यंत त्याने अकरा बोगस वेबसाइट बनवून त्याद्वारे अनेकांची फसवणुक केली आहे. या अकरा वेबसाइटची माहिती काढण्याचे काम सुरु असून त्या वेबसाइटच्या माध्यमातून आतापर्यंत किती लोकांची किती रुपयांची फसवणुक झाली आहे याचा पोलीस तपास करीत आहेत. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आशिषने ज्या अकरा बोगस वेबसाइट तयार केल्या आहेत, त्या पुढीप्रमाणे आहेत.
१) https://white-stones.in/,
२) https://jollyfashion.in/,
३) https://fabricmaniaa.com/,
४) https://takesaree.com/,
५) https://www.assuredkart.in/,
६) https://republicsaleoffers.myshopify.com/,
७) https://fabricwibes.com/,
८) https://efinancetix.com/,
९) https://www.thefabricshome.com/,
१०) https://thermoclassic.site/,
११) https://kasmira.in/