मुक्तपीठ टीम
कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पसरला आहे. सध्या भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट आलेले दिसत आहे यापासून बचावशाली शस्त्र म्हणजे लसीकरण. देशात कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसीकरण सुरू झालेल्या एक वर्ष पूर्ण झाले. १६ जानेवारी २०२१ पासून लसीचे १५६ कोटी डोस देण्यात आले आहेत. देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील ७.४० कोटी किशोरवयीन आणि ९४ कोटी प्रौढ आहेत. यासह, सध्या लसीकरणयोग्य लोकसंख्या १०१.४० कोटी आहे. मात्र, यातील ११ कोटी पात्र भारतीयांनी अद्याप एकही डोस घेतला नाही.
जास्त संरक्षणासाठी लसीचे दोन्ही डोस आवश्यक!
- तज्ज्ञांच्या मते, लसीचा केवळ एक नाही तर दोन्ही डोस आवश्यक आहेत.
- लसीचा पहिला डोस शरीराला अँटीबॉडीज निर्मितीसाठी तयार करतो.
- लसीचा दुसरा डोस अँटीबॉडीज तयार करतो.
- लसीचे दोन्ही डोस ठरलेल्या मुदतीत वेळेवर घेणे महत्वाचे आहे.
११ कोटी पात्र भारतीय अजूनही लसवंत नाही
- आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात कोरोना लसींचे १५६ कोटी २ लाख ५१ हजार ११७ डोस देण्यात आले आहेत.
- त्यात जवळपास ६५% लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
- त्याचवेळी भारतात १०.९९ कोटी लोकांनी एकही डोस घेतलेला नाही.
- २५ कोटी लोकांचा अजून दुसरा डोस बाकी आहे.
भारतात १० लाखांमागे ११ लाख डोस!
- भारतात प्रति १० लाख लोकसंख्येमागे ११ लाख लसीचे डोस दिले असे प्रमाण आहेत.
- लसीकरणात ब्रिटनचा वेग सर्वात चांगला आहे. १० लाख लोकसंख्येमध्ये १९ लाख डोस आहेत.
- अनेक देशांनी बूस्टर डोस देखील स्थापित केले आहेत. त्याची सुरुवात अलीकडे भारतात झाली आहे.
एका वर्षात ३६० कोटी डोस उत्पादनाची क्षमता
- देशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कोविशील्ड आणि भारत बायोटेकचे कोवॅक्सिन लसीकरणासाठी वापरले जात आहे.
- पुण्यातील सीरमची लस निर्मिती क्षमता दरमहा २५ कोटी आणि हैद्राबादच्या भारत बायोटेकची ५ कोटी आहे.
- सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडे १० कोटींपेक्षा जास्त डोस तयार आहेत.
- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे १५ कोटी लसी आहेत.
केंद्रीय आरोग्य विभागाने १५ जानेवारीला जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 58 लाखांहून अधिक (58,02,976) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 156 कोटी 02 लाखांचा (1,56,02,51,117)टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,67,37,458 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. त्याचवेळी लसींच्या बुस्टर डोसचे प्रमाणही वाढते असून रविवारपर्यंत ३८ लाख ४ हजार ३७६ बुस्टर डोस देण्यात आले आहेत.