तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
चांगली बातमी काही बातमी नसते. नेहमीच ठासून सांगितलं जातं. आणि पुन्हा असं सांगणारेच काहीजण समाजात नकारात्मकतेचा बुजबुजाट कसा वाढला, यावरही खंत व्यक्त करताना दिसतात. समाजात सारंच काही वाईट असतं, असं कधीच नसतं. वाईट असेल तसं चांगलंही नक्कीच असतंच. उलट ते कधीही जास्तच असणार. गरज असते ती स्वच्छ दृष्टीकोनातून सभोताली पाहण्याची.
तीन दशकांच्या पत्रकारितेत चांगल्या बातम्या लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न याआधीही काही वेळा केला. पण नोकरीच्या मर्यादांमुळे आणि तिथं व्यावसायिक नफ्या तोट्याची गणितं सांभाळायची असल्याने फार करता आलं नव्हतं. नोकरीच्या काहीशा आर्थिक सुरक्षिततेतून बाहेर येऊन स्वतंत्र पत्रकारितेचा प्रयोग सुरु करायचं ठरवलं. मुक्तपीठ हे वर्तमान स्थितीची गरज ओळखणारे नाव दिलं. त्यावर काम सुरु असतानाच सोबत आलेली एक चांगली कंपनी मागे फिरली. पुढे तसाच अनुभव एका वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या व्यावसायिकासोबत आला. पण ठरवलं असल्यानं शुभारंभ केला. त्यामुळे सोबत इतर कुणी नसताना आणि सामान्यांकडून आपल्या वेडासाठी आर्थिक मदत मागायची नाही, हे ठाम ठरवले असल्याने जे बळ होत त्यातच स्वतंत्र पत्रकारितेचा प्रयोग सुरु केला. त्यात पुन्हा भाराभर घ्यायचे आणि मग मानधन कमी करायचे किंवा थकवायचे, असे करायचे नव्हते. स्वाभाविकच चांगलं मानधन देऊन ज्येष्ठ सहकारी घेता आले नाही. तरुणांवर भर दिला. त्यांचे प्रशिक्षण सुरु केले. त्यांना एक टास्क द्यावा, म्हणून मनातील सकारात्मक बातम्यांच्या प्रयोगाची कल्पना मांडली. सुदैवाने त्यांना ती आवडली आणि त्यांनी ती आपलीशी केली. टीम मुक्तपीठच्या लेकींनी ३० ऑक्टोबर २०२० रोजी यूट्युब, फेसबूकच्या माध्यमातून गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्राचा शुभारंभ केला. आता वर्ष झालं.
याचा आर्थिक फायदा तोटा मांडायला अद्याप वेळ आहे. पण इतरांकडूनही या संकल्पनेवर काम सुरु असणं हुरुप वाढवणारं ठरलं. मुक्तपीठच्या गुड न्यूज मॉर्निंगच्या प्रयोगासारखेच काही चांगले सकारात्मक पॉझिटिव्ह बातम्यांचे प्रयोग मोठ्या माध्यमांकडूनही सुरु झाले आहेत. पण तेवढं सातत्य दिसत नाही. याउलट पुरेसं बळ नसतानाही टीम मुक्तपीठनं खंड पडू न देता गेलं वर्षभर सातत्य दाखवलं आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
आता तर “इंडिया टुडे – आजतक” चालवणाऱ्या या देशातील आघाडीच्या माध्यम समुहाने गुड न्यूज टाइम हे पूर्णवेळ चांगल्या बातम्यांचं न्यूज चॅनल सुरु केलं आहे. याचा अर्थ गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रामागे तसेच मुक्तपीठच्या स्वतंत्र पत्रकारितेच्या उपक्रमामागे असलेली “चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार!” “Good News, Straight Views!” संकल्पना योग्यच असल्याची खात्री पटली. मी केवळ वैचारिकतेतून भावनिक चूक करु शकतो. पण एवढा मोठा समूह तसं करणार नाही. त्यांचे निर्णय व्यावसायिक अभ्यासातूनच असतात.
मुक्तपीठला आर्थिक रसद पुरवण्यासाठी मी राजकीय, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील काहींसाठी समाज माध्यम सल्लागार, माध्यम सल्लागार, लघुपट लेखन, निर्मिती, पुस्तक, भाषण लिखाण वगैरे जमेल तेवढ्या सेवा, जे मागतात त्यांना पुरवतो. पगारी उत्पन्न बंद असल्यानं आणि टीमला काही झालं तरी त्यांचं मानधन वेळेवरच देता यावं, या कर्तव्यपूर्तीसाठी हे सारं करणं आवश्यक आहे. पण त्यामुळे मी पत्रकारितेएवढाच या अर्थार्जनाच्या कामांमध्ये व्यग्र राहतो. आजवर नोकरीला नोकरी न मानता सकाळी ६ ते रात्री १२ सक्रिय राहण्याची सवय आता उपयोगी ठरत आहे. पण मुक्तपीठसाठी १०० टक्के देता येत नाही. ती कमतरता भरून काढण्याचे काम अपेक्षा सकपाळ, रोहिणी ठोंबरे, वृषाली कोतवाल, सुश्रुषा जाधव, पूजा शिंदे, समिक्षा राणे यांच्यासारखे मुक्तपीठ टीममधील इतर सहकारीही करतात. अर्थात या साऱ्या कार्यात बाहेरून सहकार्य करणाऱ्या अनेक चॅनलमधील अनेकांचा मोठा वाटा आहे.
हे सारं सांगण्याचं कारण मुक्तपीठच्या चांगल्या बातम्यांच्या गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्राचं सारं श्रेय टीम मुक्तपीठमधील या लेकींचं आहे. माझं नाही.
चॅनलमध्ये असताना कमलेश देवरुखकर, मनिष आंजर्लेकर यांच्यासारखे माझे क्रिएटिव्ह सहकारी मला सांगायचे, सर तुम्हाला काही दाखवले की तुम्ही भरभरून कौतुक करता. पण त्यानंतर ‘पण’ शब्द वापरून ज्या अपेक्षा मांडता त्याचं टेन्शन येतं. मी सांगायचो, “अरे बाबांनो, तुळशीदास भोईटेचं समाधान तुळशीदास भोईटेही करु शकणार नाही. तुम्ही मस्तच करताय…पण आणखी मस्त करु शकाल.” आणि खरंच ते करायचे. मी मराठीसारख्या चॅनलला काही काळ मिळालेलं नंबर एकचं स्थान, सातत्यानं नंबर दोनचं स्थान आणि एकाच वर्षातील पाच एनटी अॅवार्ड याचं श्रेय अशा प्रामाणिकपणे परिश्रम घेणाऱ्या प्रतिभावंत सहकाऱ्यांचंच होतं.
असा दर्जासाठी टोकाचा आग्रह धरणारा स्वभाव असतानाही तांत्रिक दर्जाच्या बाबतीतील उणेपणा हा सध्या माझ्या अडचणींमुळे आहे. त्यात या तरुणाईचा दोष नाही. तांत्रिक दर्जासोबतच व्ह्यूजमधील समस्या या माझ्यामुळेच आहेत. कारण त्यांना आवश्यक टेक्निकल सपोर्ट, डिजिटल मार्केटिंगचा सपोर्ट मी पुरवू शकलेलो नाही. पुढच्या टप्प्यात समविचारी व्यावसायिकांना सोबत घेऊन ती समस्याही दूर करू. माझ्याकडून असलेली ती समस्या नक्की दूर होईल.
समाजात चांगलही बरंच काही घडतं. ती सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कोणतेही राजकीय, वैचारिक जोखड न मानता जी व्यक्ती चांगलं काही करते, जी संस्था चांगलं काही करते ते सर्व समाजासमोर मांडण्याचा मुक्तपीठचा प्रयत्न असाच सुरु राहिलं. उलट काही चांगल्या बदलांसह ते करु. कधीही इतर अपेक्षा बाळगली नाही. पण एक अपेक्षा वारंवार मांडतो. ती लेखन, व्हिडीओ, किमान माहिती सहकार्याची. माध्यमांना पत्रकारितेच्याही बाहेर नेण्याची संकल्पना मुक्तपीठ मागे आहे. त्यासाठी “बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त!” असंही सांगत असतो. कृपया हे सहकार्य नक्की द्या. अगदी फॉरवार्डेड काही असेल तेही मुक्तपीठच्या ७०२११४८०७० या क्रमांकावर व्हॉट्सअॅप, टेलीग्रामने पाठवा.
चांगल्या बातम्या देतानाच सरळस्पष्ट विचार देण्याचा मुक्तपीठचा प्रयत्न असाच सुरु राहिल. आपली साथ असू द्या. नव्हे ती असणारच, अशी मला अपेक्षा नाही तर खात्री आहे.
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ या मुक्त माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत.)
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite