मुक्तपीठ टीम
देशभरात महिलांवरील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालात असे उघड झाले आहे की, भारतात असे कोणतेही राज्य नाही जेथे महिला व मुली सुरक्षित आहेत. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये महिलांवरील गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झाली आहे. २०१९ मध्ये दररोज भारतात सरासरी ८८ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.
एनसीआरबीच्या ‘क्राइम इन इंडिया’ २०१९ च्या अहवालात देशभर महिलांवरील सामान्य गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये महिलांविरूद्धच्या गुन्ह्यांमध्ये एकूण ४,०५,८६१ घटना नोंदविण्यात आल्या असून त्यात २०१८ च्या तुलनेत ७.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की भारतात महिला गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत.
या भीषण आकडेवारीनुसार दर १६ मिनिटाला भारतात कुठेतरी बलात्कार होतो तर दर चार मिनिटाला महिला तिच्या घरच्यांकडून कौटुंबिक अत्याचाराला सामोरे जाते. वर्षभरात झालेल्या बलात्काराच्या एकूण ३२,०३३ घटनांपैकी ११% मुली या दलित समाजातील आहेत.
“आयपीसीअंतर्गत महिलांविरूद्ध गुन्हेगारीत बरीच प्रकरणे नोंदवली गेली यात ‘पती किंवा त्याच्या नातेवाईकांद्वारे क्रूरता’ (३०.९%), ‘विनयभंगाच्या हेतूने महिलांवर हल्ला’ (२१.८%), ‘महिलांचे अपहरण’ या अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. २०१९ मध्ये ६२.४ आणि २०१८ मध्ये ५८.८ प्रत्येक लाख लोकसंख्येमागे गुन्हेगारीचे प्रमाण नोंदविण्यात आले आहे.
त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही महिलांवरील अत्याचाराची सर्वाधिक नोंद झाली आहे. २०१९ मध्ये राजस्थानमध्ये बलात्काराच्या ५,९९७ घटना नोंदविण्यात आल्या असून त्यामध्ये १३१३ अल्पवयीन मुली आहेत आणि उत्तर प्रदेशात ३,०६५ घटना घडल्या आहेत. त्याच बरोबर राजस्थान पोलिसांच्या म्हणण्यानुसार सन २०२० मध्ये ऑगस्टपर्यंत ३,४९८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राजस्थानमध्येदेखील महिला सुरक्षित नाहीत हे या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
महिलांच्या गुन्ह्याबाबत त्वरित गुन्हा नोंदवून कठोर कारवाई केली जात असल्याचे डीजीपी भूपेंद्र सिंह यांचे म्हणणे आहे. महिला गुन्हेगारीला रोखण्यासाठी कडक कायदेही बनविण्यात आले. असे अनेक भयंकर गुन्हे घडले आहेत, ज्यात दोषी अजूनही तुरूंगात आहेत. पण त्यांना फाशी देण्यात आलेली नाही.
निर्भया, हाथरस, हैदराबादसह अशा अनेक घटना घडल्या ज्याने संपूर्ण देश हादरवून टाकला. परंतु अशी काही प्रकरणे आढळून आली आहेत की ज्यावर कडक कारवाई केली गेली आणि गुन्हेगारांना फाशी देण्यात आली. भारतात कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून जेव्हा असे गुन्हे घडतील तेव्हा अशा प्रकरणात दोषींना अवघ्या काही दिवसांतच फाशी देऊन मृत्युदंड ठोठावण्यात येईल.