मुक्तपीठ टीम
भाजपा हा भारतातील सर्वाधिक प्रभावशाली आणि मोठा राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. २०१४ पासून केंद्रात भाजपाचे सरकार आहे. सर्वाधिक राज्यांमध्येही भाजपाचेच मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना या जुन्या भाजपा मित्रपक्षातील फुटीनंतर आता तामिळनाडूतील अण्णा द्रमुक या मित्रपक्षातही फूट पडली आहे. त्यामुळे भाजपाबरोबर युती करणाऱ्या पक्षांमध्ये पुढे फूट पडण्याची परंपरा सुरुच असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
भाजपाने १९८०मध्ये स्थापना झाल्यापासून आजवर अनेक राजकीय पक्षांसोबत युती केली आहे. महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना युती ही तर सर्वात जुनी युती आहे. दक्षिण भारतातसुद्धा भाजपाची अनेक पक्षांसह युती आहे. मात्र यासर्वांमध्ये भाजपासोबत ज्यांची युती होती त्यांची पुढे माती झाल्याचे अनेक उदाहरणं आता आठवली जात आहेत. त्याचं कारण महाराष्ट्रातील शिवसेनेनंतर तामिळनाडूतील अण्णा द्रमुक या भाजपाच्या जुन्या मित्रपक्षात पडलेली फूट आहे.
सोमवारी अण्णा द्रमुकमध्ये राडेबाजी झाली. पक्षाच्या ताब्यावरून पनीरसेल्व्हम आणि पलानीस्वामी गटांमध्ये संघर्ष झाला. पक्ष कार्यालयात तोडफो़ड करण्यात आली. ज्येष्ठ नेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांची कोषाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व काढून घेतले गेले.
अण्णा द्रमुकटा एक गट इडाप्पाडीच्या पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली संघर्षाला उभा ठाकला आहे. तर पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट तयार झाला आहे. यानिमित्ताने भाजपासोबत युती केलेले पक्ष फुटण्याची परंपरा सुरु असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ ज्या पक्षांची दोन शकलं झाली, त्या सर्वांची कधी ना कधी भाजपशी युती होती!”
ते ते फुटले, जे भाजपाला बिलगले!
- शिवसेना
- स्वाभिमानी शेतकरी संघटना
- अण्णा द्रमुक
- लोक जनशक्ति
- पीडीपी
- तेलुगू देशम
- जनता दल संयुक्त
- अकाली दल
- एजेएसयू
- सुहलदेव भारतीय समाज पार्टी
- अपना दल