मुक्तपीठ टीम
वाढदिवस म्हटला की मोठा थाट ठरलेलाच. त्यातही लाडक्या मुलांचा असला तर आई-वडिलांच्या उत्साहाला उधाण येतं. मात्र, काही आई-वडिल अशा आनंदोत्सवातही सामाजिक बांधिलकीचं भान हरवू देत नाहीत. सोलापूरचे महामुरे कुटुंब अशा पालकांपैकीच एक. त्यांनी त्यांच्या मृणाल या लेकीचा वाढदिवस घरगुती साजरा केला. पण त्याचवेळी शाळेतील मुलांसाठी एक वेगळीच कल्पना लढवली. त्यांनी मृणालच्या वर्गमित्रांना दिली ती पुस्तकांची पार्टी. शाळेतील ग्रंथालयात ही पुस्तकं पोहचताच मुलांचा उत्साह वाढला.
मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील वर्ग-ग्रंथालयास गोष्टीची अनेक पुस्तके भेट म्हणून दिली. शिक्षकांनी पुस्तके टेबलवर ठेवली. प्रत्येक मुलाला एक-एक पुस्तक वाचनासाठी दिले.
या स्तुत्य उपक्रमासाठी लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळा, सोलापूर शाळेतील शिक्षिका सौ. मेलगिरी मॅडम, मुख्यध्यापिका राठोड मॅडम आणि इतर सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. तसेच आजी निलीमा महामुरे, आई अर्चना महामुरे, बाबा नीरज महामुरे आणि लहान बहीण स्वरा या सर्वांनी मदत केली, निरज महामुरे यांनी मुक्तपीठला सांगितले. ते म्हणाले की, “दरवर्षी नवीन असा उपक्रम करतो. अनाथ मुलांच्या आश्रमास खाऊसाठी देणगी, वृक्षारोपण, निराधारांना नाष्टा देतो. तसेच यावर्षी पुस्तकं पार्टी केली.
निरज महामुरेंची पुस्तक पार्टीमागील भूमिका
कोरोना आल्यापासून सर्वांचेच खुप नुकसान होत आहे. न भरून येणारे नुकसान म्हणजे मुलांचे शैक्षणिक नुकसान, पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. परंतु मुलांची वाचन करण्याची सवय मात्र संपल्यात जमा झाली. त्याचा परिणाम विचार करण्याची क्षमता कमी होऊ लागली. याचाच परिणाम की काय मुल खुप चीड चीड करू लागली किंवा एकदमच शांत राहू लागली. मुलांच्या अशा वागण्यामुळे भविष्यातील गंभीर परिणामाची जाणीव होऊ लागली. मुलांना पुन्हा वाचनाची सवय लागावी, यासाठी पालक म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत.
पाहा व्हिडीओ: