मुक्तपीठ टीम
एक मेपासून भारतातील अठरा वर्षांवरील वयोगटासाठीही कोरोना लसीकरण करण्यास केंद्रातील मोदी सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, तसे करणे महाराष्ट्रात तरी अवघडच दिसत आहे. कारण २४ मेपर्यंत उत्पादन होणार असलेल्या सर्व कोविशिल्ड लसी या केंद्र सरकारसाठी बुक केल्या गेल्या आहेत. को-वॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने अद्याप राज्य सरकारांसाठी दरही जाहीर केलेले नाहीत. केंद्राकडून होणारा लसींचा पुरवठा हा ४५ वर्षांवरील वयोगटासाठीच वापरावा लागणार आहे. त्यामुळे १८ ते ४५ वयोगटाला कोरोनाच्या सरकारी लसीसाठी सध्या तरी वाटच पाहावी लागणार आहे. जर पुढील आठवडाभरात मार्ग निघाला तरच तरुणांचे लसीकरण शक्य होणार आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणांचे एक मेपासूनचे लसीकरण अवघड आहे. त्यांनी सांगितले की, सीरमच्या अदार पुनावाला यांनी राज्य सरकारला दिलेल्या माहितीनुसार २४ मेपर्यंत सीरम उत्पादन करणार असलेल्या सर्व लसी या केंद्र सरकारसाठी बुक केल्या गेल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारला मिळू शकतील. त्यामुळे तरुण वयोगटाच्या लसीकरणाची मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती तरीही महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये लसींची व्यवस्था झाली नाही तर तरुणांचे लसीकरण एक मेपासून होणे अवघड दिसत आहे. सीरमच्या पुनावालांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाइन चर्चा झाली. त्या चर्चेत पुनावाला यांनी २४ मेपर्यंत उत्पादन होणाऱ्या सर्व कोविशिल्ड लसी केंद्रासाठी बुक असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर त्यातील ५० टक्के देशभरातील राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना मिळू शकतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी मागणी केल्यानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील वयोगटासाठी लसीकरणास मान्यता दिली. तसे करताना ती जबाबदारी राज्य सरकारांवर टाकण्यात आली. मात्र, राज्याला त्यासाठी सीरम इंस्टिट्युटकडून कोविशिल्ड मिळवणे पुढील महिनाभर तरी शक्य नाही हे आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीमुळे स्पष्ट झाले आहे.
सीरमच्या कोविशिल्डच्या दरांशी तुलना करता परदेशी लसींचे दर जास्त असल्याने त्यांचे भारतीय उत्पादन सुरु होईपर्यंत त्या मिळवणे शक्य दिसत नाही. आता आशा आहे ती भारत बायोटेकच्या को-वॅक्सिनच्या पुरवठ्याची. त्यांच्याकडून लस पुरवठा झाला तर तरुणांचे १ मेपासून लसीकरण सहज शक्य होऊ शकेल. सध्या तरी ते अवघड दिसत आहे.
मुक्तपीठ भूमिका
ज्यांना लसीचा पहिला डोस दिला त्यांच्या दुसऱ्या डोससाठी तसेच ४५ वर्षांवरील बाकी राहिलेल्यांच्या पहिल्या डोससाठीही लसी लागणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या लसी केंद्र सरकार पुरवते. त्यामुळे केंद्राला कोटा लागणारच. अपेक्षा होती की, तरुणांच्या लसीकरणाची घोषणा करताना केंद्राने लस पुरवठ्याचे नियोजनही तारखेनुसार करुन दिले पाहिजे होते. तसे केले जात नाही. आधी मागणीला महत्व द्यायचे नाही. जगात कुठे घडते काय विचारायचे, आणि अमेरिकेने सरसकट लसीकरण सुरु केल्यावर आपल्याकडे घोषणा करायची. पण तसे करताना नेमके नियोजन मात्र करायचे नाही, हे योग्य नाही. अपेक्षा आहे, केंद्राने आता तसे नियोजन करावे.
- तुळशीदास भोईटे