मुक्तपीठ टीम
जगभरात थैमान घातलेला कोरोनाचं संक्रमण हे चीनच्या प्रयोगशाळेमधून झालेलं नाही, असं सांगत जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) चीनला क्लीन चीट दिली आहे. मात्र यावर ब्रिटनमधल्या १८ वैज्ञानिकांनी आक्षेप घेतला आहे. माहिती आणि संशोधनाच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार चीनचं निर्दोषत्व सिद्ध होत नाही, असं कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या १८ वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वुहानच्या लॅबमधून कोरोनाचं संक्रमण झालेलं नाही, या दाव्यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. वैज्ञानिकांच्या या टीममध्ये भारतीय वंशाचे रविंद्र गुप्ता यांचाही समावेश आहे. गुप्ता हे क्लिनिकल मायक्रोबायॉलजिस्ट आहेत. या तज्ज्ञांनी कोरोना निर्मितीचे २ सिद्धांत सांगितले आहेत. य़ातला पहिला सिद्धांत म्हणजे कोरोना हा वुहानच्या लॅबमधूनच जगभरात पसरला. आणि दुसरा सिद्धांत म्हणजे कोरोना एखादं जनावर किंवा पक्षाच्या माध्यमातून माणसाच्या शरिरात पोहोचला. हे दोन्ही सिद्धांत संक्रमणामागे असण्याची दाट शक्यता आहे, असा दावा वैज्ञानिकांनी प्रसिद्ध जनरल सायन्सला लिहिलेल्या पत्रात केला आहे.
या पत्रानुसार, वुहानच्या लॅबमधून अपघाताने कोरोना बाहेर पसरला असावा, यादृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेनं चौकशी केली नसावी किंवा त्यादृष्टीने विचार केला गेला नसावा. जागतिक आरोग्य संघटनेनं चीनच्या वैज्ञानिकांसोबत मिळून बनवलेल्या अहवालात लॅबमधून अपघातीदृष्ट्या संक्रमण पसरणं अशक्य असल्याचं म्हटलंय. वटवागुळाच्या किंवा तत्सम प्राण्याच्या माध्यमातून कोरोना पसरल्याची शक्य़ता अहवालात नमूद करण्यात आली आहे. मात्र या अहवालात कोरोना संक्रमणाचं ठोस कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही.