मुक्तपीठ टीम
शिवसेनेतील ४० आमदारांना फोडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. कधी विश्वासदर्शक ठराव तर कधी गटनेते आणि प्रतोदपदावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देत आहेत. दरम्यान आमदारांनतर एकनाथ शिंदे आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसमोरमोठं आव्हान उभ राहिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या भाजपाच्या या संभाव्य हालचालींचा अंदाज असल्यानेच बहुधा उद्धव ठाकरेंनी वेळीच काही हाचचाली केल्या. २० जूनच्या रात्री शिंदेंच्या बंडाची माहिती मिळताच सरकारची सत्ता वाचवण्यापेक्षा पक्षातील सत्ता ताब्यात ठेवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले.घे ते तेव्हापासून सतत शिवसेना नेते, पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. त्यांना सर्वात मोठा दिलासा आहे, तो शिवसेनेच्या संविधानाचा. पण त्यातही शिंदेंसोबत पहाडासारख्या असणाऱ्या भाजपाने वेगळी काही चाल खेळली तर अडचण नको, म्हणून ते खूपच काळजीपूर्वक प्रयत्न करीत आहेत.
शिवसैनिकांकडून घेण्यात येत असलेली प्रतिज्ञापत्रे ही शिवसेनेच्या मूळ पक्षाची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न आहे. न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडील कायदेशीर लढाईत ही प्रतिज्ञापत्रे शिवसेना ही ठाकरेंचीच हे ठरवण्यासाठी उपयोगी ठरतील, अशी अपेक्षा आहे. हे ओळखूनच शिंदे गटाचे आमदार प्रवक्ते दीपक केसरकर यांनी “वीस रुपयांच्या वडापाव खाणाऱ्या शिवसैनिकाला १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्राचा खर्च” अशी टीका केली, असे म्हटले जाते.
शिंदे गटाने शिवसेनेच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. एकीकडे ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी भाजपासोबत जाण्याच्या विरोधात आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला भाजपासोबत युती हवी आहे.
उद्धव ठाकरेही अॅक्शन मोडवर!
- शिंदे गटाची ही खेळी ठाकरे यांना माहीत आहे.
- तसेच, त्यांनी गेल्या काही दिवसांत पक्षाच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या आहेत.
- मंगळवारीही शिवसेना अध्यक्ष आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांशी ऑनलाइन चर्चा केली.
- व्हिडिओ कॉल व्यतिरिक्त ठाकरे वैयक्तिकरीत्या पदाधिकाऱ्यांशी बोलत आहेत.
- पक्षश्रेष्ठींना सोबत ठेवण्याबरोबरच त्यांनी पक्षात पदांवर असलेल्या शिंदे यांच्या निष्ठावंतांविरोधातही कारवाईची सुरुवात केली आहे.
- मंगळवारी एकनाथ शिंदे यांचे समर्थक किरण पांडव यांची हकालपट्टी केली.
- पांडव गडचिरोली जिल्हा निमंत्रक होते.