मुक्तपीठ टीम
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या आरोपामुळे चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबई क्राईम ब्रँच खंडणीच्या प्रकरणात परमबीर सिंग यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनची चौकशी करीत आहे. दरम्यान, या प्रकरणात गुन्हे शाखेने फरार गुंड छोटा शकीलचा भाऊ अन्वरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच इतर दोन जणांवर वसुलीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चौकशीत एसआयटीच्या हाती फरार गुंड छोटा शकील यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. २०१६ ची ही ऑडिओ क्लिप आहे. यावेळी परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.या ऑडिओमध्ये शकील एका बिल्डरला धमकी देत आहे. दरम्यान, शकील संजयला दुसरा बिल्डर श्याम सुंदर अग्रवालसोबत सेटलमेंट करायला सांगतो.
याप्रकरणी यापूर्वी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाच ऑडिओ समोर आल्यानंतर अन्वरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ऑडिओच्या आधारे तपास पथक परमबीर सिंगचीही चौकशी करत आहे.
श्याम सुंदर यांनी परमबीरविरोधात गुन्हा दाखल केला होता
- श्याम सुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंगसह ६ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे.
- एसआयटी याच प्रकरणाची चौकशी करत आहे.
- श्याम सुंदर अग्रवाल यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परमबीर सिंग यांनी त्यांना बनावट प्रकरणात गोवले होते आणि त्यांच्याविरोधात MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- श्याम सुंदर यांनी आरोप केला आहे की, परमबीर सिंग आणि त्यांच्या काही सहकारी पोलिसांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलीच नाही तर सुरक्षा पुरवण्याच्या नावाखाली पैसेही उकळले.
छोटा शकीलचाच आहे फोन नंबर
- गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या क्रमांकावरून बिल्डर संजय पुनमियाला फोन करण्यात आला होता तो फक्त छोटा शकीलचा आहे.
- हा नंबर आधीच पोलिसांच्या नोंदीमध्ये आहे.
- संजय पुनमिया यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी श्यामसुंदर अग्रवालविरोधात गुन्हाही दाखल केला होता.
- शकील आणि पुनमिया यांच्यातील हे फोन रेकॉर्डिंग वर्ष २०१६ चे आहे, परंतु कारवाई यावर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात आली होती.
परमबीरविरोधात लुकआऊट नोटीस जारी
- अशाच अन्य एका प्रकरणात, मुंबईचे बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना यांनी परमबीर सिंगसह २८ लोकांविरुद्ध खंडणीसाठी एफआयआर दाखल केला होता.
- ठाणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अनेक वेळा फोन करूनही सिंग त्यांच्यासमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.
- यानंतर ठाणे पोलिसांनी शुक्रवारी परमबीरविरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती.