मुक्तपीठ टीम
अॅमेझॉन इंडियाने चीनवर अवलंबून राहणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे भारतातच उत्पादन करणार असल्याची घोषणा केली आहे. अॅमेझॉनला सरकारच्या मेक इन-इंडिया धोरणाचा फायदा होईल. चेन्नईतील फॉक्सकॉन कंपनी क्लाउड नेटवर्क तंत्रज्ञानासह फायर टीव्ही स्टिकचे उत्पादन करेल.
या वर्षाच्या शेवटी चेन्नईत उत्पादन सुरु होईल.
अॅमेझॉन चीन आणि तैवानमधून आपल्या बाजारासाठी मोठ्या प्रमाणात फायर टीव्ही स्टिक मागवते. आता मात्र धोरण बदलू लागले आहे. अॅमेझॉन इंडियाच्या एका ब्लॉग पोस्टनुसार, कंपनी दरवर्षी भारतात लाखो उपकरणे बनविण्याचा विचार करीत आहे. देशांतर्गत मागणीनुसार उत्पादन क्षमता वाढविण्यावर विचार करेल.
भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी प्रोत्साहक धोरण स्वीकारले आहे. त्याचा फायदा घेत अॅमेझॉन इंडिया मेक इन इंडिया प्रतिबद्धता दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मानले जाते. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. तसेच रोजगार निर्माण होईल आणि भारतीय नवउन्मेषास चालना मिळेल,” असे अॅमेझॉन इंडियाचे प्रमुख अमित अग्रवाल यांनी ट्विट केले आहे.
अॅमेझॉन इंडिया टीमसोबतच्या बैठकीस उपस्थित असलेले आयटी मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही ट्विट केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतातील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगने जागतिक दिग्गजांकडून मोठी गुंतवणूक आकर्षित केली आहे.
अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी रोजगार निर्मिती पूरक धोरण जाहीर केले आहे. त्यांच्या दाव्यानुसार २०२५ पर्यंत अॅमेझॉन इंडियाला एकूण दहा लाख रोजगार निर्मितीची इच्छा आहे.
पाहा व्हिडीओ: