मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या कविकुळातील थोर ॠषी वि. वा. शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब यांच्याकडे पंचमहाभूतांना कवेत घेण्याची ताकद होती. आज तीच ताकद मला कविवर्य अशोक बागवे यांच्यात दिसते आणि त्याचा मला विलक्षण अभिमानही आहे, अशा गौरवपूर्ण शब्दांत ज्येष्ठ नाट्य अभिनेते, कादंबरीकार अशोक समेळ यांनी प्रा. अशोक बागवे यांचे नवरसभरीत वर्णन केले.
निमित्त होते, पनवेल संघर्ष समितीने अत्यंत मोजक्या कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत प्रा. बागवे यांच्या सत्तरीनिमित्त आयोजित केलेल्या गौरव समारंभाचे. त्यांच्या हस्ते प्रा. बागवे यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर अशोक समेळ यांनी बागवे यांच्या कर्तुत्वाच्या आभाळाचे एक एक पदर आपल्या अभिनयपूर्ण शैलीतून उलघडवून दाखविले. समेळ यांच्या जिव्हेवर स्वार झालेली सरस्वती शब्दाशब्दांतून झंकारत होती.ते म्हणाले की, शिरवाडकर यांना भेटायला आम्ही नाशिकला जात होतो. त्यांच्या भेटीचा जेवढा आनंद मिळायचा तोच आनंद मला अशोक बागवेंना भेटल्यावर आजही होतो. त्याच्या जादूभर्या शब्दांना आजही सलाम ठोकतो. इतर कवी त्यांच्या प्रतिभेने त्यांच्या त्यांच्या जागी ग्रेट आहेत. त्याबाबत मला शंकाच नाही. परंतु शिरवाडकर यांच्यानंतर त्यांच्या ताकदीचा मला गवसलेला कवी, साहित्यिक म्हणून अशोककडे पाहतो असे सांगत त्याच्याशिवाय मीसुद्धा अपूर्ण आहे, असे सांगताना अश्ववस्थामा आणि ते आभाळ भिष्मांची होते या दोन्ही कादंबरीना त्याचीच प्रस्तावना आहे, असे समेळ यांनी सांगितले.
दिवंगत नाटककार वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने काही आठवणी सांगताना अश्रूंची झाली फुले या नाटकातील काही संवाद आपल्या अभिनयाच्या नजाकतीसह अशोक समेळ यांनी सादर केले. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचे चांदणे शिंपले.
आपल्या सशक्त अभिनयासह आवाजातील चढउताराने भिंतींचेही कान तृप्त करून समेळ यांनी कार्यक्रमाला चार चॉंद लावले.
प्रा. अशोक बागवे यांचे सत्काराला उत्तर देणारे अप्रतिम शैलीतील भाषण झाले. कप्तान वैभव दळवी, डॉ. अशोक पाटील, कविवर्य साहेबराव ठाणगे, बालकवींचे नातू कवी अशोक गुप्ते, माजी नगरसेवक रमेश गुडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
पनवेल संघर्ष समितीच्या महिला पदाधिकार्यांनी प्रा. बागवे यांना सत्तर तेजोमय दिव्यांनी औक्षण करून वातावरण उजळून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक कांतीलाल कडू यांनी केले.
कार्यक्रमाला सुरेशशेठ भोईर, योगेश पगडे, सुनील भोईर, डॉ. हेमंत पाटील, सचिन पाटील, हरेश पाटील, भूषण साळुंके, महेंद्र पाटील, समीर भगत यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.
कांतीलाल प्रेमळ माणूस!
कांतीचा व्हाट्स अप आल्याशिवाय मला झोपच लागत नाही, असे अगदी दिलखुलासपणे सांगत अशोक समेळ यांनी कांतीलाल हा अतिशय प्रेमळ माणूस असल्याने आम्हा सर्वांना त्याने माणुसकीने गुंफले आहे. त्यामुळे त्याच्या शब्दाला नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी सांगितले.
बँकेच्या घोटाळ्याचे प्रकरण हाताळताना त्याला राज्य शासन आणि इतरांची किती मदत होईल माहित नाही, पण तो एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढत आहे. केवढा तरी त्याच्याकडे उत्साह आहे. त्यांच्या कार्याची माहिती वाचून खुप आनंद होत आहे. त्याच्यावर संलग तीन ते चार तास बोललो तरी अपुरे पडेल असे त्याचे आणि पनवेल संघर्ष समितीचे उत्तम कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.