मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला ड्रग्जप्रकरणी अटक केल्यानंतर गुरुवारी दुपारी स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी समीरला न्यायालयाने सोमवार १८ जानेवारीपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे समीरची चौकशी करण्यासाठी एनसीबीला आता चार दिवस मिळणार असून या चौकशीतून इतर काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, अटकेनंतर समीरच्या वांद्रे येथील राहत्या घरासह जुहू परिसरात एनसीबीने छापे टाकले होते, या कारवाईत काहीही आक्षेपार्ह सापडले नसल्याचे सांगण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत एनसीबी कोठडीत असलेले सिनेअभिनेत्री दिया मिर्झाची माजी मॅनेजर राहिला मोहम्मद हुसैन फर्नीचरवाला, आणि ब्रिटीश नागरिक करण सेजनानी यांच्या एनसीबी कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या तिघांनाही गुरुवारी बंदोबस्तात स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
गेल्या आठवड्यात एनसीबीच्या अधिकार्यांना एका कुरिअरविषयी माहिती मिळाली होती. या कुरिअरमधून दोनशे किलो गांजाचा साठा सापडला होता. हा गांजा अमेरिकेतून कुरिअरमधून पाठविण्यात आला होता. चौकशीअंती हा साठा वांद्रे येथे राहणारा ब्रिटीश नागरिक करण सेजनानी यांनी मागवला होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी एनसीबीने समन्स पाठविले होते. चौकशीत करण हा गांजा त्यानेच कुरिअरमधून मागविल्याची कबुली दिली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ड्रग्जप्रकरणी एनसीबीने गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यानंतर सिनेअभिनेत्री दिया मिर्झा हिची माजी मॅनेजर राहिला मोहम्मद हुसैन फर्नीचरवाला, तिची बहिण शायस्ता मोहम्मद हुसैन फर्निचरवाला यांचीही चौकशी झाली होती. या चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे या तिघांनाही शनिवारी एनसीबीच्या अधिकार्यांनी अटक केली होती. अटकेनंतर त्यांना रविवारी दुपारी स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी राहिला आणि करणला गुरुवार १४ जानेवारीपर्यंत एनसबी कोठडी सुनावण्यात आली. तर शायस्ताला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. तिच्या वतीने तिच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन तिची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती. या तिघांच्या अटकेनंतर मुच्छड पानवाला म्हणून परिचित असलेल्या रामकुमार तिवारीला या अधिकार्यांनी अटक केली होती. त्याची न्यायालयीन कोठडीनंतर मंगळवारी स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. त्यानंतर याच गुन्ह्यांत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांचे नाव समोर आले होते.
त्यामुळे त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स एनसीबीकडून बजाविण्यात आले होते. या समन्सनंतर समीर हे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर त्यांना या गुन्ह्यांत एनसीबीने अटक केली. अटकेनंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना सोमवार १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या वांद्रे येथील घरासह जुहू परिसरात एनसीबीने छापे टाकले होते. त्यांच्या घरातून या अधिकार्यांना काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. मात्र जुहूची कारवाई सुरु असल्याने या कारवाईचा तपशील समजू शकला नव्हता. दुसरीकडे राहिला आणि करण यांच्या एनसीबीची कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांच्या एनसीबी कोठडीत शनिवार १६ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या दोघांना आता शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.