मुक्तपीठ टीम
अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या फेऱ्यांमागून फेऱ्या होत असताना शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांची आघाडी वाढतेच आहे. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या क्रमांकावरची मते ही नोटाला मिळत आहेत. निकाल येत असतानाच एका न्यूजचॅनलने प्रतिक्रिया विचारली असता एका शिवसैनिकाने उत्स्फुर्त प्रतिक्रिया व्यक्त केली की, नोटाला मिळालेली मतं ही भाजपाला मिळालेली मतं आहेत!
अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर होताच तिथे महाराष्ट्रातील राजकीय संघर्षाचे पडसाद उमटणार हे स्पष्ट झाले होते. तसं घडूही लागले. ज्यांच्या अकाली निधनामुळे तिथे निवडणूक जाहीर झाली, ते आमदार रमेश लटके हे शिवसेनेचे होते. तरीही शिवसेना वाचवण्याचा दावा करत बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने ती जागा भाजपासाठी सोडली. २०१९च्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युती असतानाही बंडखोरी केलेले माजी अपात्र नगरसेवक मुरजी पटेल यांना भाजपाने उमेदवारी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची उमेदवारी ऋतुजा रमेश लटकेंना जाहीर होताच त्यांचा राजीनामा मुंबई मनपाने मंजूर करण्यात दिरंगाई केली. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा रमेश लटकेंचा मार्ग मोकळा झाला. पण त्यामुळे अंधेरीत त्यांच्याविषयीची सहानुभूती जास्तच वाढली. तसेच शिवसेनेचे नाव-चिन्ह गोठवत नवे नाव, नवे चिन्ह मशाल लोकांपर्यंत पोहचवण्यातही झालं.
या सर्व परिस्थितीमुळेच शिंदे गटाकडून मिळवलेली, कधीही न जिंकलेली अंधेरीची जागा लढवण्याऐवजी तेथे माघार घेण्याचा निर्णय भाजपाने घेतला. त्यासाठी राज ठाकरेंनी लिहिलेले पत्र, शरद पवारांचं आवाहन पुढे करण्यात आलं.
मात्र, त्यानंतर तेथे काहीजण नोटा वाटत नोटाचं बटन दाबा, असा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अॅड. अनिल परब यांनी केला. त्यामुळे आजच्या मतमोजणीत नोटाला मिळत असलेली मते ही तसा प्रचार करण्याचा परिणाम असल्याचे मानले जाते. टीव्ही9शी बोलताना शिवसैनिकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही बोलकी आहे.
कडवट भाजपा समर्थक असणाऱ्या अनेकांनी मुरजी पटेलांची उमेदवारी मागे घेतल्यानंतर भाजपाच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला होता. तशा कडवट समर्थकांची मतेही नोटीकडे वळली असण्याची शक्यता आहे.