मुक्तपीठ टीम
ईलेक्ट्रिक स्कूटर, ईलेक्ट्रिक बाइक, ईलेक्ट्रिक कार, ईलेक्ट्रिक बस, ईलेक्ट्क ट्रक…सारी वाहनं विजेच्या बॅटरीवर धावू लागलीत. आता त्यात पुढचं पाऊल उलललंय ते युरोपातील नॉर्वेनं. नॉर्वेने जगातील पहिले असे जहाज लाँच केले आहे जे बॅटरीवर चालते. त्यामुळे हवेतील धुरामुळे प्रदूषण तर होणार नाहीच, पण समुद्रातील प्रदूषण रोखण्यासही मदत होणार आहे. या प्रकारच्या बॅटरीवर चालणाऱ्या या जहाजाद्वारे मालवाहतूक केली जाणार आहे. हे जहाज दोनच दिवसांपूर्वी समुद्रात उतरवण्यात आले आहे. हे जहाज बनवण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे प्रदूषणाला आळा घालण्याचा आहे.
या ई-कार्गोला यारा बर्कलँड असे नाव देण्यात आले आहे. याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कोणत्याही उत्सर्जनाशिवाय समुद्रात आपला प्रवास पूर्ण करू शकणार आहे. इतकेच नाही तर, त्याची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात एकही क्रू नसेल, त्यामुळे ते क्रू विना जहाज असेल. ओस्लोच्या किनार्यालगत ते पाण्यात उतरवण्यात आल्याने भविष्यातील धोका कमी होईल, अशी आशाही पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. या जहाजाची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या सीईओ स्वीनी टोरी होस्ल्थर यांनी या जहाजाच्या लँडिंगबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, या जहाजाला तयार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र या सर्व अडचणींवर मात करून ते समुद्रात उतरवण्यात सर्वात जास्त यश मिळाले.
जहाजाविषयीची सविस्त माहिती
- सेन्सर्सच्या मदतीने हे जहाज एकावेळी ७.५ नॉटिकल मैल अंतर पार करू शकते.
- ८० मीटर लांबीच्या या जहाजात ३ हजार २०० डेडवेट टन वाहून नेण्याची क्षमता आहे.
- जलविद्युतपासून आवश्यक ऊर्जा मिळते.
- यासाठी बोर्डावरील मशीन रूमच्या जागी आठ बॅटरी कोच बसवण्यात आले आहेत.
- यामुळे जहाजाला सुमारे ६.८ मेगावॅट ऊर्जा मिळेल आणि जहाज वेगाने पुढे जाऊ शकेल.
२०५० पर्यंत समुद्रातील प्रदूषण सुमारे ५० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वर्षाला सुमारे ४० हजार डिझेलवर धावणारे ट्रक रस्त्यावर कमी होऊ शकतील. हे जहाज नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बनडायऑक्साइड उत्सर्जन रोखण्यासाठी मदत करेल. तसेच रस्ता सुरक्षाही वाढेल. यामुळे हवेत उडणारी धूळ आणि ध्वनी प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल.