मुक्तपीठ टीम
दुग्धजन्य पदार्थांचा वापर न करता, सोयाबीनपासून तयार करण्यात आलेले दही विकणाऱ्या ब्रँड्सना आता त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेटवर ‘नॉन डेअरी उत्पादने’ असा स्पष्ट उल्लेख करणे अनिवार्य असणार आहे. पुढील वर्षाच्या १ एप्रिलपासून हे नवे नियम लागू होतील. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने १३ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत हे निर्देश दिले आहेत.
अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, “जर आंबवलेले सोयाबीन दही, दुग्धजन्य पदार्थ न वापरता बनवले असेल तर त्याच्या लेबलवर ‘नॉन-डेअरी उत्पादन’ घोषित करणे अनिवार्य आहे. याशिवाय दुग्धजन्य पदार्थांचा काही प्रमाणात उत्पादनात वापर केला असेल, तर हे प्रमाणही नमूद करणे आवश्यक आहे. या उत्पादनांच्या लेबलांमध्ये लॅक्टिक ऍसिडची टक्केवारी मानकांशी सुसंगत, प्रथिने आणि चरबीची टक्केवारी इत्यादी सर्व नमूद करणे अनिवार्य आहे.”
एफएसएसएआयने अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या कलमांतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून अन्न सुरक्षा आणि मानके २०११ मध्ये सुधारणा केली आहे. या नियमनाला आता फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स फर्स्ट अमेंडमेंट रेग्युलेशन, २०२२ म्हटले जाईल. यातील प्रस्तावित तरतुदी १ एप्रिल २०२३ पासून लागू होतील.