मुक्तपीठ टीम
रिकाम्या पोटात पेटलेला वणवा शमवण्यासाठी तब्बल साडेतीन तास पावसात २०० फुटांवर भला मोठा एलईडी बॅनर्स लावणा-या कामगारांचा ‘विमा’ काढण्याची तोशिस त्यांना हे काम देणारा कंत्राटदार कधीच घेत नाही…‘आज के दिन जो पैसा मिला वो अपना’ अशी ‘मानसिक वेदना’ बांद्र्याहून ठाण्याला आलेल्या रईस खान या कामगाराने व्यक्त केली.
सायंकाळी ६ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढू लागला असतानाच त्याने व त्याच्या दोन सहका-यांनी चपळाईने सुमारे २०० फुट उंचीवर असलेला आधीचा बॅनर हटवला आणि लांबच्यालांब असलेल्या दोरखंड्याला गुंडाळलेला बॅनर उंचावर खेचून घेतला. हे तिघेही १०० फुटाजवळ गेल्यानंतर त्याच्या सहका-यांनी फलकामागे असलेल्या लोखंडी पट्टींचा वापर करुन उर्वरित १०० फुटांवर काही क्षणांत पोहचले आणि फलकामागे जाऊन त्यांनी रईस खानला बॅनर लावण्यासाठी विविध प्रकारची मदत सुरु केली. त्यावेळी रईस फक्त एकटाच काम करत होता. त्याच्या कमरेला गुंडाळलेला दोरखंड हाच त्याचा काय तो आधार होता. बॅनरच्या एकदम वरच्या टोकावर गेलेले त्याचे सहकारी त्याला ‘बॅनर’ बरोबर लावण्याची मदत करत होते. त्यावेळी पावसाने पुन्हा जोर धरला तरीही ते थांबले नाही.
पावसाचा वाढलेला जोर आणि त्यापाठोपाठ झालेला काळोख असूनही त्यांनी काम अजिबात थांबवले नाही. जाहिरात फलकावर बसवसलेल्या दोन प्रकाशझोतात त्यांचे काम सुरुच होते. हा भलामोठा बॅनर ज्या कंपनीतर्फे बसवण्यात आला होता, त्याचे कोणीही प्रतिनिधी त्यांच्या कामांवर देखरेख करण्यासाठी आले नव्हते. तरीदेखील रईस खान त्यांना हे काम कसे चोख झाले पाहिजे, दिसले पाहिजे याच्या सूचना देत होता. या दोघांंनी एकदा चुकीचे काम केल्यामुळे, ते दुरुस्त करण्यासाठी रईस स्वत: झपझप फलकाच्या उंच टोकावर पोहचला. त्यावेळी वा-याचा जोर असूनही त्याने माघार घेतली नाही. फलकावर असलेले काही एलईडी दिवे व्यवस्थित बसवले नसल्याचे लक्षात येताच त्याने एकट्याने त्याची दुरुस्ती उंचीवर असतानाच केली. काळोख पडला असतानाही त्याने व त्याच्या सहका-यांनी हे काम हातावेगळे केले,त्यावेळी रात्रीचे ९. ३० वाजले होते. झाडावर बागडणारी खार जमीनीकडे वेगाने येते, तसे हे तिघेही जमीनीवर उतरले.
‘आज या कामासाठी फक्त २ हजार रुपये मिळाले आहे. कामातील धोक्याची तुलना करता हे काम खुप जोखमीचे, धोक्याचे असते. पण हे काम करताना आम्ही कधीही नशा-पाणी करत नाही. त्यामुळे हे काम फत्ते झाले. हे धोकादायक काम करताना हे आमच्या कुटुंबासाठी करतो, अशी भवना कायम असते. त्यामुळे आत्तापर्यंत कधीच अपघात झालेला नाही. हे असे काम नेहमीच मिळतेच असे नाही, परंतू अल्लाहची आमच्यावर कृपा आहे, अशी प्रतिक्रिया रईसने व्यक्त केली.