मुक्तपीठ टीम
क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात गेल्या १७ दिवसांपासून अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य आरोपींना आजही जामीन मिळालेला नाही. मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. तीन ऑक्टोबरला अटक करण्यात आलेला आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही २१ ऑक्टोबरला संपत आहे. आता आर्यन आणि त्याच्या साथीदारांनी जामीनासाठी उच्च न्यायालयातच जावे लागेल. तेथेच त्यांचा जामीन होण्याची शक्यता आहे.
न्यायालयीन लढाईत कोण, कोणासाठी?
- अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी याप्रकरणी एनसीबीची बाजू मांडली.
- त्यांच्यासोबत अॅड. श्रीराम शिरसाट आहेत. एसपीपी अद्वैत सेठना हेही एनसीबीचे प्रतिनिधित्व करत आहेत.
- ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई हे आर्यन खानसाठी बाजू मांडत होते.
जामिनाविरोधात एनसीबीचा युक्तिवाद
- अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केलेल्या युक्तिवादानुसार, रेकॉर्ड आणि पुरावे दर्शवतात की आर्यन गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे ड्रग्स घेत होता.
- आर्यन खूप प्रभावी आहे आणि जर जामिनावर सुटला तर पुराव्यांशी छेडछाड किंवा कायद्यापासून पळून जाण्याची शक्यता आहे.
- आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज यांना ठोस पुराव्यांच्या आधारे अटक करण्यात आली आहे.
- ड्रग्स रॅकेटचे परदेशी संबंध तपासले पाहिजेत.
- हे एक मोठे षड्यंत्र आहे ज्याची चौकशी होणे आवश्यक आहे.
- आर्यन अरबाजकडून ड्रग्ज घेत असे, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये.
- एनसीबीने न्यायालयात एक व्हॉट्सअॅप चॅट देखील ठेवला आणि दावा केला की या चॅटच्या तपासात उघड झाले आहे की ड्रग्स प्रकरणात आर्यन खानची महत्वाची भूमिका आहे.
आर्यनच्या जामिनासाठी बचाव पक्षाने काय युक्तिवाद केला?
- बचाव पक्षाने आर्यनला जामीन मिळावा म्हणून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पंचनामा करून आरोपींवर लावलेल्या कलमांवर युक्तिवाद केला.
- आर्यनकडून कोणतेही ड्रग्स जप्त करण्यात आले नाहीत.
- एनसीबीला कोणतीही रोख रक्कम मिळाली नाही.
- ज्या व्यक्तीने आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित केले, त्याला अटक नाही.
- आर्यनचा मुनमुन धामेचाशी कोणताही संबंध नाही.
आर्यनचा जबरदस्तीने जबाब घेतल्याचा आरोप
- आर्यनचे वकील अमित देसाई यांनीही आर्यनच्या कबुलीजबाबाचे सक्तीचा जबाब म्हणून वर्णन केले आहे.
- देसाई म्हणाले की, एनसीबी असे म्हणत आहे की आर्यनने कबूल केले आहे की तो अरबाजसोबत चरस घेणार होता, परंतु न्यायालयालाही गोष्टी कशा केल्या जातात, ते माहित आहे.