मुक्तपीठ टीम
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज परभणी दौर्यात शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या परिसरामध्ये ऊर्जा विभागाच्या वतीने ‘मिशन ऑक्सिजन’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटला भेट देवून पाहणी केली.
परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सिजन प्रकल्प विक्रमी वेळेत महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी परभणी जिल्हा परिषदेच्या परिसरात स्थापन केल्याबद्दल आणि तेथून वैद्यकीय प्राणवायू निर्मिती सुरू केल्याबद्दल डॉ. राऊत यांनी महानिर्मितीच्या अधिकारी वर्गाचे विशेष अभिनंदन केले. ऑक्सिजन प्लांटला अखंडीत वीजपुरवठा होण्याच्या दृष्टिने योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले की, मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई व परभणी येथे ऊर्जा विभागाच्या वतीने ‘मिशन ऑक्सिजन’ अंतर्गत ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेशी मुकाबला करताना या दोन्ही प्लांटची आरोग्य यंत्रणेला मोठी मदत झाली आहे. ८६ हजार लीटर प्रतितास क्षमता असलेला हा प्लांट अल्पावधीत उभा करून कार्यान्वीत केल्याबद्दल ऊर्जा विभागाच्या व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन ही डॉ.राऊत यांनी केले.
यावेळी खासदार बंडू जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, एमएसईबी सुत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महानिर्मितीच्या परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, अधीक्षक अभियंता श्याम राठोड, महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे, कार्यकारी अभियंता कैलास जमदाडे, प्रमोद क्षिरसागर तसेच काँग्रेसचे सिध्दार्थ हत्तीअंबिरे, नदीम इनामदार आदी उपस्थित होते.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दौऱ्याची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. याप्रंगी परभणी जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.