मुक्तपीठ टीम
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीची नुकतीच पासिंग आउट परेड झाली. यावेळी अनेक उमेदवारांनी भारतीय सैन्याचा गणवेश परिधान करून देशाची सेवा करण्याची शपथ घेतली. पण सर्वांचे लक्ष लेफ्टनंट नितिका कौल ढौंढियाल यांच्यावर होते. लेफ्टनंट नितिकानेही तोच गणवेश परिधान केला होता, जो एकेकाळी तिचा शहीद पती मेजर विभूती शंकर ढौंढियालसाठी सन्मानाची बाब असायचा. लेफ्टनंट नितिका या शहीद मेजर विभूती यांच्या पत्नी आहेत. मेजर विभूती फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते.
‘आय लव्ह यू’ बोलून शहीद पतीला श्रद्धांजली
‘जय हिंद’ आणि ‘आय लव्ह यू’ बोलून पती शहीद मेजर विभूती ढौढियाल यांना अंतिम निरोप दिल्यानंतर लेफ्टनंट नितिका चर्चेत आल्या होत्या. पती शहीद झाल्यानंतर नितिकाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) परीक्षा पास केली आणि त्यानंतर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) ही उत्तीर्ण झाल्या. आता नितिका लेफ्टनंट आहे. खांद्यावर असलेल्या दोन ताऱ्यांसह तिचा फोटो सध्या चर्चेत आहे. कमिशन सोहळ्यात नॉर्थन आर्मी कमांडर आणि कारगिल वॉर हीरो लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांनी स्वतः लेफ्टनंट नितिकाच्या खांद्यावर तारे लावले. त्यावेळी ते लेफ्टनंट नितिकाला म्हणाले की, “आज आम्हाला तुझ्याबद्दल अभिमान वाटतो.” त्यांनी या शूर लेफ्टनंटचे सैन्यात स्वागत केले.
मेजर ढौंढियाल यांचे कार्य आणि लेफ्टनंट नितिकासोबतची भेट
१८ फेब्रुवारी २०१९ रोजी, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात मेजर विभूती शहीद झाले होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात ४० सैनिक शहीद झाले. या हल्ल्यानंतरच सैन्याने पुलवामाच्या पिंगलान गावात दहशतवाद्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी मोहीम राबविली. पिंगलानमध्ये झालेल्या या चकमकीत चार सैनिक ठार झाले. तेथे मेजर विभूती ढौंढियाल देखील होते. मेजर ढौंढियाल हे डेहराडूनचे रहिवासी होते. त्यांची आणि नितिकाची भेट फेसबुकवर झाली होती. काही काळ बोलल्यानंतर आणि भेटल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
नितिका त्यावेळी एचसीएल नोएडा येथे कार्यरत होती. मेजर ढौंढियाल आणि नितिकाच्या लग्नाला १० महिने पूर्ण झाले होते. एप्रिल २०१९ मध्ये त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवसही होता. पती शहीद झाले पण नितिकाने माघार घेतला नाही. सप्टेंबर २०१९ मध्ये तिने एसएससीचा फॉर्म भरला. सैन्याच्या काही अधिकाऱ्यांनी तिचे मार्गदर्शन केले. नितीकाच्या म्हणण्यानुसार, एसएससीची परीक्षा उत्तीर्ण होणे हा तिच्यासाठी खूप मोठा क्षण होता. नितिका म्हणते की, ती एक शूर शहीदाची पत्नी असून तिला तिच्या पतीचा अभिमान आहे.
पाहा व्हिडीओ: