मुक्तपीठ टीम
पंतप्रधान मोदींनी नुकताच हिरवा झेंडा दाखवत काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचं उद्घाटन केलं होतं. या अत्याधुनिक आणि सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनने मुंबईहून अहमदाबादला जात असताना म्हैशींच्या कळपाला धडक मारली. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या हायस्पीड ट्रेनचा पुढील अर्धा भाग तुटला आहे आणि इंजिनचे नुकसान झाले आहे. हा ट्रेन अपघात मुंबईहून अहमदाबादला जात असताना वातवा आणि मणिनगर स्टेशनदरम्यान घडला आहे. या अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
अपघातानंतर २० मिनिटं ट्रेन थांबवली!
- मुंबईकडून अहमदाबादला येणाऱ्या ट्रेनचा सकाळी ११.१८ मिनिटांनी अपघात झाला.
- अपघातानंतर वंदे भारत ट्रेन सुमारे २० मिनिटे थांबवावी लागली. यानंतर ट्रेनच्या तुटलेल्या भागाची दुरुस्ती केल्यानंतर ती अहमदाबादकडे रवाना झाली.
- सकाळी ११.१५ वाजता अचानक म्हैशींचा कळप रेल्वे ट्रॅकवर आला आणि ही जोरदार धडक झाली.
- याबाबत, अहमदाबाद रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जितेंद्र जयंत यांनी ही माहिती दिली.
मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही भारतीय रेल्वेची भारतातील तिसरी हाय-स्पीड ट्रेन आहे. यापूर्वी, नवी दिल्ली-वाराणसी आणि नवी दिल्ली-माता वैष्णो देवी कटरा दरम्यान दोन हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनचे संचालन सुरू करण्यात आले होते.
पंतप्रधान मोदींनी ३० सप्टेंबर रोजी उद्घाटन केले
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० सप्टेंबर रोजी गुजरात दौऱ्यात गांधीनगर ते मुंबई दरम्यानच्या हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.
- पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांची पाहणी केली आणि उपलब्ध सुविधांचाही आढावा घेतला.
- ट्रेनच्या लोकोमोटिव्ह इंजिनच्या कंट्रोल सेंटरचीही त्यांनी पाहणी केली.
- वंदे भारत ट्रेन यशस्वी करण्यासाठी कष्ट करणाऱ्या कामगार, अभियंते आणि इतर कर्मचाऱ्यांशीही पंतप्रधान मोदींनी संवाद साधला होता.
भारतात ४०० पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन चालवल्या जाणार
- भारतीय रेल्वे देशभरात ४००पेक्षा जास्त सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे.
- हायस्पीड ट्रेनमध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट, स्वयंचलित सरकते दरवाजे आणि प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन पुश बटणे आहेत.
- केंद्र सरकारने मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत ट्रेनचे सुमारे १६०० डबे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.