मुक्तपीठ टीम
एनईएसटीएस अर्थात आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेने एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील शिक्षकांसाठी थेट संवादातून क्षमता निर्मितीचा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला आहे. लर्निंग लिंक्स फाउंडेशन या संस्थेशी केलेल्या सहकारी भागीदारीसह अॅमेझॉन कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमाअंतर्गत हा अमेझॉन भविष्यातील अभियंते कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, एनईएसटीएस आणि अमेझॉन यांच्यातील या सहकारी संबंधांमुळे शिक्षक तसेच विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक सक्षम होण्यास मदत होईल. सध्याच्या दशकात हा उपक्रम देशाच्या दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या लोकांशी डिजिटल संपर्क साधण्याची सुरुवात करण्यात उपयुक्त ठरेल. एकलव्य निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील अभियंते कार्यक्रम अत्यंत लाभदायक ठरेल असे ते पुढे म्हणाले. “भविष्यातील अभियंते हा कार्यक्रम एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये संगणकाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल,” केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात, नवी दिल्ली येथील वायएमसीए सभागृहात २८ आणि २९ डिसेंबर २०२२ या दोन दिवशी, थेट संवादात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील आंध्रप्रदेश, गुजरात,मध्यप्रदेश,ओदिशा,राजस्थान आणि तेलंगणा या सहा राज्यांतील संगणक कक्ष आणि स्थिर सक्रीय इंटरनेट जोडणीसह, डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या, सुमारे ५४ एकलव्य निवासी शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविणे हे अॅमेझॉन भविष्यातील अभियंते कार्यक्रमाच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमातील अभ्यासक्रमामध्ये संगणकीय विज्ञानाची पायाभूत माहिती, कोडींगची ओळख, लॉजिकल क्रमनिर्धारण, लर्निंग लूप्स, कोड.ओआरजी सारख्या मुक्त सुरक्षित स्त्रोताचा वापर करून ब्लॉक प्रोग्रामिंग करणे, तंत्रज्ञानविषयक चर्चा करण्यासाठी क्लास चॅट सत्रांचे आयोजन, या क्षेत्रातील तंत्रज्ञानसंबंधी विविध उपक्रमांची माहिती, इत्यादी घटकांचा समावेश आहे.