मुक्तपीठ टीम
संशोधकांनी जगभरात वापरण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसींना नियमित बदल करत राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. कारण कोरोना विषाणूचे नवनवे रुप समोर येत आहेत. जगातील भारत, ब्राझिलसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे कोरोना लसींमध्ये या त्या त्या भागातील कोरोना विषाणूंच्या प्रकारांनुसार बदल आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भारतातसह जगभरात कोरोना रुग्णसंख्या उफाळू लागली आहे. त्यात वेगवेगळ्या कोरोना स्ट्रेन्समुळे होणारा संसर्ग जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. परदेशात आढळलेले कोरोनाचे नवे स्ट्रेन भारतातही आढळून येत आहेत. इतर कोरोना विषाणूंच्या तुलनेत नोवल कोरोना विषाणूमध्ये बदलण्याची गती अधिक आहे. त्यामुळे लसीमध्येही त्या बदलांनुसार बदल आवश्यक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
भारतात आतापर्यंत ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधल्या स्ट्रेनचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. ब्रिटनमधल्या स्ट्रेनसह दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधल्या स्ट्रेनचाही जगभरात फैलाव होत आहे. कोरोना विषाणूंच्या या स्ट्रेनमध्ये जनुकीय बदल झाल्यामुळे मानवी प्रतिकारशक्ती तेवढा प्रतिकार करु शकणार नाही. तसेच सध्याच्या लशी कोरोनाच्या या स्ट्रेनवर तितक्या प्रभावी ठरणार नाहीत, अशी शक्यता आहे. त्यामुळेच लसींमुळे बदल करत राहणे आवश्यक मानले जात आहे.