मुक्तपीठ टीम
पंतप्रधान मोदींचा तीन दिवसांचा युरोप दौरा पार पडला आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान बर्लिनमध्ये एका भारतीय वंशाच्या मुलीने पंतप्रधानांना स्वतःच्या हातांनी बनवलेले चित्र दाखवले, त्यावर मोदींनी मुलीचे कौतुक केले आणि ऑटोग्राफ दिला. यासोबतच एका मराठी मुलाने पंतप्रधान मोदींना देशभक्तीपर गीतही सुनावले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. पण याच दरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या व्हिडिओची एडिट केलेला व्हिडीओ शेअर केल्याने त्याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सुरुवातीला त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. यानंतर मुलाच्या वडिलांनी त्याला ट्विटरवरून फटकारले. आता नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने ट्विटर आणि दिल्ली पोलिसांकडे कामराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एनसीपीसीआरने आपल्या राजकीय विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी लहान मुलाचा वापर करणे हे बाल न्याय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात यावा आणि कुणाल कामरा यांच्यावर असा मजकूर पोस्ट केल्याबद्दल कठोर कारवाई करावी, अशी मागणी आयोगाने केली आहे. एनसीपीसीआरने दिल्ली पोलिसांकडून सात दिवसांत अहवाल मागवला आहे.
कुणाल कामरा यांनी पंतप्रधान मोदी आणि मुलामधील संभाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. हा मुलगा पंतप्रधान मोदींना ‘हे जन्मभूमी भारत’ हे गाणे बोलून दाखवत होता पण त्याऐवजी ‘महांगाई डायन’ हे गाणे लावण्यात आले. यानंतर मुलाचे वडील गणेश पोळ यांनी कुणाल कामरा यांना फटकारले आणि मुलाला नीच राजकारणात ओढू नका, असे सांगितले.
मुलाच्या वडिलांनी कामराला फटकारले, “गरीब मुलाला तुमच्या घाणेरड्या राजकारणापासून दूर ठेवा आणि तुमचे वाईट विनोद दुरुस्त करा.” कामराने उत्तर दिले की व्हिडिओ एका वृत्तसंस्थेने सार्वजनिकरित्या प्रदर्शित केला होता. कामरा यांनी ट्विट केले की, “विनोद तुमच्या मुलावर नाही. तुम्ही तुमच्या मुलाचे त्याच्या मातृभूमीसाठी सर्वात लोकप्रिय मुलासमोर गाण्याचा आनंद घेत आहात, परंतु आणखी काही गाणी आहेत जी त्याने आपल्या देशातील लोकांकडून ऐकली पाहिजेत.”