मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागरिकांकडून निर्बधांचे योग्य पालन होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सगळीकडे अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रस्तावित लॉकडाऊनला विरोधी पक्ष भाजपकडून विरोध होत असतानाच आता सत्तेत सहभागी असणारी राष्ट्रवादी काँग्रेसही लॉकडाऊनविरोधात बोलू लागली आहे. त्याचवेळी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही लॉकडाऊनच्या आर्थिक साइडइफेक्टकडे मुख्यमंत्री ठाकरेंचं लक्ष वेधलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कामगार मंत्री नवाब मलिक म्हणाले की, “महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. पण तरीही लॉकडाऊन राज्याला परवडणार नाही. तो जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. त्या ऐवजी आरोग्य सुविधा वाढविण्यावर आणखी भर देण्यात यावा अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.”
“याधीच आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केल्या देखील आहे. पण लोकांनीही काळजी बाळगणं आणि नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. नियम पाळले गेले तर कोरोना प्रसार होणार नाही,” असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
आनंद महिंद्रांनी दिला मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला
सामाजिक जाण ठेवण्यासाठी ओळखले जाणारे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही उद्धव ठाकरेंना ल़ॉकडाऊन विरोधातील सल्ला दिला आहे. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भाजपने याआधीच केला आहे लॉकडाऊनला विरोध
शिवसेनेचा सत्तेतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्याआधीच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपाने लॉकडाऊनला विरोध केला आहे. सध्या दोन पक्षांच्या राजकीय युतीची चर्चा कम अफवा जोरात असताना लॉकडाऊनविरोधाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांची युती दिसत आहे.
“राज्य सरकार सर्वसामान्यांना एक रुपयाचेही पॅकेज देणार नाही. मात्र, कोरोनावर नियंत्रणाच्या नावाखाली राज्य सरकार जर लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडली आहे. तसेच मातोश्रीवर बसून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना होणारा त्रास कसा कळणार? असा टोलाही चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला.
वाचा काय आहे लॉकडाऊनबद्दल भाजपाची संपूर्ण भूमिका: