मुक्तपीठ टीम
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात रायगड जिल्ह्यातील पालीच्या माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गीता पालरेचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. मा. गीता पालरेचा यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधागड अध्यक्ष तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, अभिजीत चांदोरकर, दिलीप परब, शाम खंडागळे, सुशील शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना मा. रविंद्र चव्हाण म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी नेतृत्व म्हणून गीताताई पालरेचा यांची ओळख आहे. त्या पाली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या तसेच नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या होत्या. परंतु त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आपण त्यांचे भाजपाच्या नेतृत्वाच्या वतीने पक्षात स्वागत करतो.
ते म्हणाले की, गीता पालरेचा व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाचे रायगड जिल्ह्यातील बळ वाढले आहे. सुधागड तालुक्यात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्यासाठी हे कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील.