मुक्तपीठ टीम
मुंबईच्या रस्त्यांवर ३ हजार ५१० खड्डे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अॅड.अमोल मातेले यांनी केला आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई मनपाच्या खड्डेमय कारभाराचा सचित्र पंचनामा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिनव आंदोलन सुरु झाले आहे. मुंबई महापालिका अभियंत्यांना सचित्र खड्डेदर्शन घडवण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई मनपातील खड्डेमय कारभाराचा सचित्र पंचनामा सुरु केला आहे. खड्डेच खड्डे चोहीकडे अशी काहींशी अवस्था झालेल्या मुंबई आणि पूर्व उपनगरांतील एक दोन नव्हे तर तब्बल ३,५१० खड्ड्यांचे रस्ते, मार्गासह सचित्र दर्शन राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका प्रशासनाला घडविले आहे. गेल्या १७ दिवसांहून अधिक काळ गणेशोत्सव तोंडावर आल्याने मुंबई शहर आणि परिसरात खड्डे बुजवा यासाठी निवेदने, पाठपुरावा आंदोलन करूनही जराही कान हलवत नसलेल्या यंत्रणेला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अॅड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनव आंदोलन छेडले आहे.
राष्ट्रवादीतर्फे मुंबई महापालिका प्रमुख अभियंते (रस्ते विभाग) राजन तळकर यांना घेराव घालून मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची फोटोसह भेट देण्यात आली.
मुंबई आणि पूर्व उपनगरातील अंधेरी, कांदिवली, साकीनाका आदी परिसरातील रस्त्यांवर एक दोन नव्हे तर तब्बल ३,५१० खड्डे आहेत, असा दावा करताना सर्वाधिक खड्डे हे मुंबई उपनगरात आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अॅड.अमोल मातेले यांनी दिली. आम्ही आतापर्यंत अनेकदा मुंबई महापालिका प्रशासनाला खराब रस्ते दुरुस्त करा, या संदर्भात निवेदने दिली होती. परंतु, त्यानंतरही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने आम्ही येत्या काळात झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अॅड. मातेले यावेळी दिला.
गेल्या वर्षी कोरोना महामारीत गणेशोत्सव साजरा करू न शकलेल्या मुंबईकरांना यंदा तरी उत्सवी नाही परंतु थाटामाटात गणपती उत्सव साजरा करू असे वाटत होते. परंतु, कोरोना महामारीचे संकट पूर्णपणे मावळले नसतानाही चांगले रस्ते सर्वाधिक बजेट असलेली मुंबई महापालिका करदात्यांना देवू शकत नाही. ही करदात्या मुंबईकरांची उपेक्षा नव्हे का, असा सवालही अॅड. मातेले यांनी उपस्थित केला आहे.
‘मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात रस्तेकामासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद असतानाही शहरातील सर्वच रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. उड्डाणपूल रस्त्यांची कामेही कासवगतीने सुरू आहेत. एकीकडे इंधनदरवाढीने सर्वसामान्य मुंबईकर मेटाकुटीला आला असताना वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना तीन ते चार किमीचे अंतर पार करण्यासाठी तासन्तास रखडपट्टी सहन करावी लागत आहे. सततच्या ट्रफिक ब्लॉकमुळे मुंबईकरांवरील ताणतणाव कोरोना काळात आणखीनच वाढत चालला आहे. कंत्राटदार आणि पालिका अधिकार्यांच्या भेसळयुक्त युतीने मुंबईकरांना खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यांतून दरवर्षी प्रवास करावा लागत आहे. याप्रश्नी १९ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई महापालिका प्रमुख अभियंते (रस्ते विभाग) यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले होते. हे खड्ड्यांत गेलेले रस्ते सुरळीत करण्यासाठी आठवडाभराची मुदत देण्यात आली होती. परंतु, त्यानंतर ऐन गणेशोत्सवातही खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यांतून मुंबईकरांना दिलासा न मिळाल्याने राष्ट्रवादीने येत्या काळात आपल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.