मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील ड्रग्जच्या काळ्या धंद्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे. या कारवाईपासून वाचण्यासाठी ड्रग्ज पेडरल अनेक मार्गांचा अवलंब करून ड्रग्जची विक्री करत आहेत. हल्ली केकमध्ये ड्रग्ज मिसळून विक्री करण्याच्या घटना समोर येत आहेत. दक्षिण मुंबईतील नामांकित रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरला एनसीबीने अटक केली आहे. या डॉक्टरने त्याच्या घरात बेकरी बनवली होती. तो केकमध्ये ड्रग्ज मिसळून विक्री करत होता. या बेकरीतून १० किलो ड्रग्जचा केक जप्त करण्यात आला आहे.
सोमवारी माझगाव इथल्या कन्सल्टंट सायक्रॅटिस्ट रहमीन चरनियाच्या घरी काल एनसीबीने आपल्या पथकासह धाड टाकली. या धाडीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. केकच्या स्वरूपात असलेलं सुमारे १०किलो हॅशीससह ३२० ग्रॅम अफू आणि १.७२ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “चरनिया हे चरस, हॅशीस आणि अफू यांच्या मिश्रणाने केक्स बनवत होते. तो शहरातील हायप्रोफाईल ग्राहकांना पुरवत होता. डॉक्टर रहमीनच्या चौकशीत आणखी एका व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. रमजान शेख असं त्याचं नाव आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी त्यालाही दक्षिण मुंबईतून अटक केली आहे. रमजान हा पुरवठादार होता. त्याच्याकडून ५० ग्रॅम हॅशीस जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या दोघांवरही नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.