मुक्तपीठ टीम
गोव्यामध्ये राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचारासाठी ९ ते १२ फेब्रुवारीपर्यंत गोव्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
गोव्यातील विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. दिनांक ९ फेब्रुवारीला कॅबिनेट संपल्यावर गोव्याला प्रचारासाठी जाणार आहे व १२ तारखेपर्यंत तिथे प्रचार करणार असल्याचे सांगतानाच इतर नेत्यांचे कार्यक्रम जाहीर झाल्यावर कळवण्यात येईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
गोव्यात मनोहर पर्रीकर यांनी भाजपला उभारी दिली. मात्र वारंवार भाजप नेते ज्यांच्यावर आरोप करत होते त्यांनाच दोन – दोन जागा देण्यात आल्या. म्हणजे मूळ भाजप लोकांचे तिकीट नाकारता येते हे भाजपने स्पष्ट केले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर यांना जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत असून आमच्या पक्षाचा त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका गोव्याचे अध्यक्ष घेतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले.