मुक्तपीठ टीम
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. अटक करण्यापूर्वी लोकसभा, विधानसभा यांच्या अध्यक्षांची परवानगी घ्यायला हवी होती, पण परवानगी घेतली नाही, असे अॅड. रिझवान मर्चंट यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी सायंकाळी दोघांना अटक केली असून आज न्यायालयात हजर केलं आहे.
अॅड. रिझवान मर्चंट यांचा दावा
- सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, कलम ४१(अ) अंतर्गत खटला सुरू झाल्यापासून १४ दिवसांच्या आत नोटीस देण्यात यावी, जी दिलेली नाही.
- ते म्हणाले की, रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १५३ ए, ३५, ३७, १३५ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
- ही अटक बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे.
हा बेकायदेशीर अटकेचा निर्णय मागे घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारला पुरेसा वेळ दिला जात असल्याचे वकिलाने सांगितले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यास आम्ही न्यायालयीन प्रक्रियेतून सुटकेचा आदेश घेऊ.
खासदार – आमदार राणांवर काय आरोप?
- राणा दाम्पत्यावर भारतीय दंड संहितेचे कलम १५३ अ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- विविध समुदायांमध्ये धर्म, भाषा इत्यादींच्या नावाखाली द्वेष निर्माण करणे असा आरोप आहे.
- मुंबईत कलम १३५ पोलिसांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.