मुक्तपीठ टीम
मुंबईत परदेशातून ऑक्सिजनचा पहिला साठा दाखल झाला आहे. फ्रान्सकडून ‘ऑक्सिजन सॉलिडॅरिटी ब्रिज’ या मोहिमेअंतर्गत ऑक्सिजनची मदत पुरविण्यात येत आहे. परदेशी ऑक्सिजन आणण्यासाठी नौदल समुद्रसेतू-२ ही मोहीम राबवत आहे. आयएनएस त्रिकंद हे नौदलाचे जहाज फ्रांसहून कतारमार्गे ४० मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन मुंबईत पोहचले. महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईतील फ्रेंच वाणिज्य दूतावासाच्या महावाणिज्य दूत सोनिया बारबरी यांच्या उपस्थितीत हा साठा महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
समुद्रसेतू-2 मोहिमेचा भाग म्हणून, कतारच्या हमाद बंदरावरून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचे क्रायोजेनिक कंटेनर्स मुंबईपर्यंत वाहून आणण्याची जबाबदारी भारतीय नौदलाच्या त्रिकंद या जहाजावर सोपविण्यात आली होती. हे जहाज ५ मे २०२१ रोजी कतारमध्ये पोहोचले आणि ४० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनसह १० मे २१ या दिवशी मुंबईत पोहोचले.
कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी भारताला फ्रान्सकडून ‘ऑक्सिजन सॉलिडॅरिटी ब्रिज’ या मोहिमेअंतर्गत ऑक्सिजनची मदत पुरविण्यात येत आहे. त्या मोहिमेचा भाग म्हणून ऑक्सिजनचा सदर साठा भारताला पाठविण्यात आला आहे. फ्रान्सच्या द्रवरूप ऑक्सिजन कंटेनर्सची कतारमार्गे भारताकडे झालेली ही पहिली खेप आहे. भारताचे कतारमधील राजदूत डॉ.दीपक मित्तल यांच्या पुढाकाराने सुरु झालेया या भारत-फ्रान्स उपक्रमाद्वारे, येत्या दोन महिन्यांत भारतासाठी ६०० मेट्रिक टनापेक्षा अधिक द्रवरूप ऑक्सिजन पोहोचविला जाण्याची अपेक्षा आहे.