मुक्तपीठ टीम
अयोध्येतील श्री राम मंदिर तीन वर्षात पूर्ण होईल. यासाठी ७० एकर क्षेत्रावर काम सुरु आहे. दगडाने बनविलेले मंदिर तीन मजली असेल. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल. तांब्याच्या सांध्यांनी १६० खांब जोडले जातील. मंदिर बांधकामात पाच लाख घनफूट दगड वापरला जाईल. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, मंदिराच्या बांधकामासाठी समर्पण निधी जमा करण्याची मोहीम राबविली गेली. या मोहिमेत १२ कोटी लोकांपर्यंत कार्यकर्ते पोहचले. कामगारांमध्ये इतका उत्साह होता की त्यांनी लडाख आणि सिक्कीम गाठले. ख्रिश्चन, मुस्लिम धर्मीयांनीही मंदिर बांधण्यासाठी निधी दिला. काही मुलांनी त्यांची पिग्गी बँक तोडून मंदिरासाठी मदत केली.
या अभियानातून देशाच्या एकात्मतेचे दर्शन झाले आहे. ते म्हणाले की, राम मंदिर बांधून अयोध्या देशाची सांस्कृतिक राजधानी होईल. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतील. यासाठी पार्किंग, दर्शन व्यवस्था इत्यादींसाठी योजना आखली जात आहे.
राजस्थानमधून सर्वाधिक निधी
- देशभरातून भाविक राम मंदिर निर्मितीसाठी निधी अर्पण करीत आहेत.
- राजस्थानातील रामभक्त या प्रकरणात आघाडीवर आहेत.
- राजस्थानातील जनतेने निधी समर्पण मोहिमेमध्ये सर्वाधिक ५५७ कोटी रुपये दिले आहेत.
- आतापर्यंत ट्रस्टला देशभरातून सुमारे तीन हजार कोटी रुपये मिळाले आहेत.
- श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने जानेवारी महिन्यात मकरसंक्रांतीच्या उत्सवापासून निधी समर्पण मोहीम राबविली आहे.