मुक्तपीठ टीम
पवित्र रमजान महिन्यात इस्त्रायली सुरक्षा दलाने जेरुसलेममध्ये अल अक्सा मशिदीत घुसून केलेल्या हल्ल्यात अनेक निरपराध मुस्लीम नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. इस्त्रायली सैन्याच्या या अत्याचाराचा निषेध भारत सरकारने करावा व भारत पॅलेस्टाईनच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा संदेश द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.
नसीम खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. यावेळी त्यांच्याबरोबर माजी खासदार ऊबेदउल्लाह खान आजमी, रजा अकादमीचे प्रमुख सईद नुरी, माजी आमदार युसुफ अब्राहानी उपस्थित होते.
इस्त्रायली सैनिकांनी नमाज पठण करणाऱ्या निरपराध मुले व महिलांवर केलेल्या अंधाधुंद गोळीबाराचे दृष्य पाहुन भारतीय मुस्लीमांना धक्का बसला आहे. मुस्लीम बांधवांसाठी अल अक्सा ही मक्का व मदिनानंतर तिसरी सर्वात पवित्र व महत्वाची मशिद आहे. इस्त्रायली सैन्याचा हा हल्ला हिटलरने ज्यूंच्या केलेल्या नरसंहाराची आठवण करुन देणारा आहे.भारतीय मुस्लीम बांधवांमध्ये या भ्याड हल्ल्यानंतर संतापाची भावना पसरली आहे. नसीम खान पुढे म्हणाले कि या हल्लाचा तीव्र निषेध करण्याचा विचार होता परंतु कोरोना महामारी लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे गर्दी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जगभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. मात्र भारत सरकारने अद्याप याचा निषेधही केला नाही. भारतीय मुस्लीमांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन भारत सरकारने या हल्ल्याचा निषेध करावा.
भारत नेहमीच पॅलेस्टाईनच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला आहे. आताही इस्त्रायलच्या हल्ल्याचा निषेध करुन पॅलेस्टाईनच्या पाठीशी भारत सरकार आहे हा संदेश जगभर पोहचला पाहिजे, अशी मागणी नसीम खान यांनी निवेदनातून केली आहे.
नसीम खान यांनी आधी मुंबईत मुस्लीम आंदोलनाचे वेळी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याबाबत हल्लेखोरांची नावे सांगून त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी. नंतर भारताबाहेर झालेल्या घटनांचा निषेध करावा.