मुक्तपीठ टीम
सध्या देशातील शेतकरी खत टंचाईच्या चिंतेत आहेत. देशातील काही राज्यांमध्ये तर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी तासनतास रांगेत उभे राहूनही खत मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्याचवेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलेले वक्तव्य त्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावरच खापर फोडणारे मानले जात आहे. तोमर यांनी खत टंचाईसाठी दुसऱ्या देशांना जबाबदार ठरवले. तेही चाललं असतं. पण पुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांनीच आता विचार करावा दुसऱ्या देशांपुढे किती झुकायचं!
परदेशातून रसायन मिळत नाही
- नरेंद्र तोमर म्हणाले की, खत आणि खत बनवण्यासाठी काही रसायने परदेशातून येतात.
- या विदेशी कंपन्या खतांबाबत सरकारला ब्लॅकमेल करतात.
- इतर देशांसमोर आपण किती झुकायचे याचा विचार आता शेतकऱ्यांनी करायला हवा, असेही ते म्हणाले.
- केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही सांगितले की, जेव्हा जेव्हा खताची कमतरता असते तेव्हा माझा ताण-तणाव वाढतो.
- देशातील सर्व मुख्यमंत्री मला फोन करतात, पण खत असेल तेव्हाच ते मिळू शकेल.
देशात नॅनो युरियाचे उत्पादन
- नरेंद्रसिंग तोमर म्हणाले की, इतर राज्यात युरिया जास्त प्रमाणात वापरला जातो परंतु, मध्य प्रदेशात कमी वापर केला जातो.
- यामुळेच इतर राज्यातील लोक मध्य प्रदेशचे पीठ खात आहेत.
- ते म्हणाले की, आता देशात नॅनो युरिया तयार करण्यात आला आहे. त्याची एक बाटली एका पोत्याएवढ्या क्षमतेची आहे.
- अनेक शेतकरी त्याचा वापर करतात.
- जेव्हा एखादी गोष्ट आपल्यात कमी पडते तेव्हा दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.