मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणाला नारळावर आधारित उद्योग केंद्र बनवण्याचे लक्ष्य ठरवले आहे. कोकणांची ओळख ही स्वादिष्ट हापूस आंबा आणि काजू उत्पादनांमुळे होत असते. अलीकडेच मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळालेल्या नारायण राणे यांना लघु उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. खादी ग्रामोद्योग विभाग देखील या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. त्या माध्यमातूनच नारळ म्हणजेच कल्पवृक्षाचा जास्तीत लात्र देत कोकणवासीयांची विकासाची इच्छा पूर्ण करण्याचा हरित संकल्प राणेंनी ठरवला आहे.
नारायण राणेंचा कल्पवृक्ष संकल्प
- कोकण विभागात नारळाचे उत्पादन वाढल्यामुळे खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून नारळाच्या तागापासून बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते, असे राणे यांचे मत आहे.
- त्यांनी त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे.
- कोकणातील सिंधुदुर्ग येथे नारळ विकास मंडळाचे प्रादेशिक कार्यालय उघडण्याची विनंती राणे यांनी कृषीमंत्र्यांना केली आहे.
- त्यामुळे नारळ उत्पादनास प्रोत्साहन मिळेल आणि कोकणात नारळांवर आधारित उद्योगांना चालना मिळेल.
- त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना कोकण रेल्वे मार्गावर नारळाची झाडे लावण्याचे आवाहन केले आहे.
- यामुळे संपूर्ण कोकण पट्ट्यात नारळाचे उत्पादन वाढवता येईल.
उद्योग आणि रोजगाराची जबरदस्त तयारी
- देशात नारळ उत्पादनात महाराष्ट्र आठव्या स्थानावर आहे.
- यामध्ये केरळ प्रथम, त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि गुजरातचा क्रमांक लागतो.
- महाराष्ट्रात फक्त किनारपट्टी कोकण भागात नारळाच्या उत्पादनासाठी अनुकूल वातावरण आहे.
- या भागातील तरुणांना रोजगाराच्या शोधात अनेकदा मुंबईला जावे लागते.
- सिंधुदुर्गात नारळ विकास मंडळाचे प्रादेशिक कार्यालय सुरू झाल्यास या प्रदेशातील नारळ आधारित उद्योगांना चालना मिळू शकते. त्याचा शेजारच्या गोव्यालाही फायदा होऊ शकतो.
- राणे स्वतः लघु उद्योग मंत्रालयात मंत्री असल्याने खादी ग्रामोद्योग विभागामार्फत या भागातील नारळ आधारित लघु व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ते स्वतः मदत करू शकतात.
राणेंच्या मंत्रिपद आणि संकल्पातून राजकीय फायदाही!
- शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजपाचे अस्तित्व निर्माण करण्याची तयारी
- शिवसेनेत असताना एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले राणे यांना कॅबिनेट मंत्रीपाद देण्यामागे भाजपला आता शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात आपला प्रभाव प्रस्थापित करायचा हेतूही आहे.
- या क्षेत्रात रोजगाराला चालना देणाऱ्या योजना चालवून राणे या उद्देशात यशस्वी होऊ शकतात.