मुक्तपीठ टीम
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाचे श्रेय संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीला आहे. १९९५ पासून मी या विमानतळाच्या उभारणीसाठी प्रयत्न करीत आहे. शिवसेना नेत्यांनी या विमानतळाचे श्रेय घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सिधुदुर्गमधील जनतेला वस्तुस्थिती ठाऊक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय लघु, माध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. भाजपाचे केंद्रीय सचिव विनोद तावडे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रसंगी उपस्थित होते.
राणे यांनी यावेळी या विमानतळाच्या उभारणीसाठी व एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा विस्ताराने आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, १९९० मध्ये मालवण – कणकवली मतदारसंघाचा आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल याचा अहवाल तयार करण्याचे काम ‘टाटा ‘ कंपनीमार्फत केले गेले. या कंपनीने दिलेल्या अहवालात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास पर्यटन क्षेत्राला चालना दिल्याखेरीज होणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा असा दर्जा मिळवून दिला. मुख्यमंत्री झाल्यानंतर विमानतळाच्या उभारणीला गती दिली. या विमानतळाच्या उभारणीचे श्रेय घेऊ पाहणारी शिवसेनेची नेते मंडळी या हालचालीत कुठेच नव्हती. शिवसेनेची राज्यात सत्ता असताना औद्योगिक विकास महामंडळाकडून या विमानतळाला पाणीही मिळू शकले नाही. विमानतळासाठी आवश्यक असलेला रस्त्यासाठीचा ३४ कोटींचा निधीही आघाडी सरकार देऊ शकले नाही. हीच मंडळी आज विमानतळाच्या श्रेयासाठी पत्रकबाजी करीत आहेत, असेही राणे यांनी नमूद केले. विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख न करून आघाडी सरकारने आपली संकुचित वृत्तीच दाखविली आहे , असेही ते म्हणाले.