मुक्तपीठ टीम
पाच वर्षापूर्वी ०८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविचारीपणे घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेकडो लोकांचे प्राण गेले, लाखो उद्योगधंदे बंद झाले, कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आणि देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटल्याप्रमाणे नोटाबंदी ही संघटीत लूट असून यामुळे जीडीपीत मोठी घसरण होईल हे आता सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या ऐतिहासिक घोडचुकीसाठी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, पाच वर्षापूर्वी ०८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविचारीपणे निर्णय घेऊन हुकुमशहाप्रमाणे देशावर नोटबंदी लादली. त्या काळा दिवसाला आज ५ वर्ष झाली आहेत. हा निर्णय घेताना नोटाबंदीमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद, बनावट चलनी नोटा संपतील अशा थापा मारून देशाची दिशाभूल केली होती. प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे उद्योग व्यवसाय छोटे व्यापारी आणि रोजगार संपले आणि देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाल्याचे आपण सर्व पहात आहोत. नोटाबंदीमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. देशाचा जीडीपी निचांकी पातळीवर पोहोचला. अनौपचारीक क्षेत्राची अवस्था बिकट झाली आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील झाले आहे.
नोटाबंदीमुळे देशातील जनतेला प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की ५० दिवसांत सारे काही आलबेल होईल. त्याला आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत पण देशाची अर्थव्यवस्था आणि सामान्य माणूस यातून सावरला नाही. नोटाबंदीचे जे उद्देश पंतप्रधानांनी सांगितले होते त्यातला एकही सफल झाला नाही. उलट अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्यामुळेच भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. देशात काहीही चांगले झाले तरी आपल्यामुळेच झाले असे सांगून प्रत्येक गोष्टींचे भांडवल करून श्रेय लाटणा-या मोदींनी आपल्या घोडचुकीबद्दल देशाच्या जनतेची माफी मागावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.