मुक्तपीठ टीम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमीच भाजपाविरोधात आक्रमक होत असतात. नेहमीच ते त्यांच्यावर टीका करत असतात. दरम्यान नाना पटोले यांनी यावेळी चक्क देशाच्या पंतप्रधान मोदींना मारण्याची भाषा केल्याचा आरोप झाला आहे. नाना पटोले यांनी ‘ मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो’ असे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्वाभाविकच भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, वाद वाढत गेल्याने पटोले यांनी आता स्पष्टीकरण दिली आहे, त्यांचे म्हणणे, “मी पंतप्रधान असा उल्लेख केलेला नाही. ‘तो’ मोदी ‘ते’ नाही तर गावकऱ्यांनी तक्रार केलेला एक ‘मोदी’ नावाचा एक गावगुंड आहे!”
पटोले नेमकं काय म्हणाले होते?
- आता पटोले यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
- या व्हिडीओमध्ये ते मोदींबद्दल आक्षपार्ह भाषा करत आहे.
- मी का भांडतो? मी आता मागील ३० वर्षापासून राजकारणात आहे.
- लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात.
- शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात.
- मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली.
- एक ठेकेदारी नाही केली.
- जो आला त्याला मदत करतो.
- म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला.
- एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे.
नाना पटोलेंच्या या व्हायरल व्हिडीओविरोधात संताप उसळला. भाजपा नेत्यांनी रस्त्यांपासून सोशल मीडियापर्यंत संताप व्यक्त केला. त्यानंतर नान पटोले यांनी वेगळाच खुलासा केला.
नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
- नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिले आहे.
- “जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत.
- सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते.
- त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो.
- तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही.
- मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे.
- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही.
मुक्तपीठ भूमिका
देशाचे पंतप्रधान असणाऱ्या नेत्याविषयीच नाही तर प्रतिस्पर्धी असणाऱ्या किंवा सोबत असणाऱ्या कोणत्याही नेत्याविषयी अशी मारण्याची, शिवीगाळीची भाषा खपवून घेतली जावू नये.
नाना पटोले हे आक्रमक नेते आहेत. काँग्रेस सोडून भाजपात गेल्यावर ते खासदार म्हणून निवडून आले होते. पण काही मुद्द्यांवर मतभेद झाल्याने, मोदींची कार्यशैली न पटल्याने ते परतले. पुन्हा भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढत असतात. पण बोलताना भान राखलंच पाहिजे. आक्रमकता ही तर्कशुद्ध असावी आक्रस्ताळी नसावी. डोकं शांत ठेऊनच सध्याच्या काळात नेत्यांनी कुठेही, कधीही बोलावे. जसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याबाबतीच्या वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला तसा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याविरोधात बोलल्यामुळे नाना पटोले यांच्याविरोधातही होणे, आवश्यक आहे.
गल्लीतील ‘नाना’भाषेची दिल्लीतही दखल, गडकरीही संतापले, भाजपाकडून देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी!