मुक्तपीठ टीम
बीड जिल्ह्यातील लोकांचे अनेक दशकांचे स्वप्न साकारण्यास सुरुवात झाली आहे. गेली अनेक वर्षे केवळ निवडणुकीचा मुद्दा बनण्याइतपच मानला गेलेला बीड रेल्वेचा प्रश्न आता प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बीडकरांनी पाहिलेलं नगर-बीड रेल्वेचं स्वप्न आता दृष्टीक्षेपात आलंय, असं म्हणता येईल. बुधवारी सोलापूरवाडी ते आष्टी या मार्गावर ट्रायल रन झाली आहे. अहमदनगर ते आष्टी या ७० किलोमीटरच्या मार्गावर वेगाने धावलेल्या गाडीच्या माध्यमातून चाचणी घेण्यात आली. आता उरलेल्या मार्गावरील काम पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जाईल. तसेच चाचणी झालेल्या मार्गावरही लवकरच रेल्वे धावण्याचा मार्गही आता मोकळा झाल्याचे मानले जाते.
बीडसाठी विकासाचा राजमार्ग!
- बीडकरांसाठी विकासाचा राजमार्ग मानला जाणारा रेल्वे प्रकल्प आता अर्थानं पुढच्या टप्प्याकडे निघाला आहे. बुधवारी महत्वाच्या टप्प्याची सुरक्षा चाचणी पार पडल्यानंतर आता लवकरच त्या मार्गावर रेल्वे सेवा सुरु होईल.
- अहमदनगर ते आष्टी अंतराचे काम पूर्ण झाले आहे.
- रुळावरून रेल्वे धावताना पाहणे हे स्वप्नवतच होते.
- आता त्यांना प्रतीक्षा आहे ती रेल्वेची प्रवाशी सेवा सुरु होण्याची.
या रेल्वेमार्गासाठी बरीच दशके प्रयत्न सुरु होते. २०१४पूर्वी या रेल्वेमार्गाला सुरुवात झाली. पण खरा वेग त्यानंतर येऊ लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये या मार्गाचा आढावा घेतल्याने रेल्वेने गंभीरतेने कामाचा वेग वाढवला. बीडच्या खासदार प्रीतम मुंडेही प्रयत्न करत राहिल्या. त्यांच्यासाठी आणि पंकजा मुंडेंसाठी हा प्रकल्प भावनात्मकही आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडेंचेही हे एक स्वप्न होते. त्याची झलक पंकजा मुंडेंच्या ट्वीटमध्ये दिसली.
निधी आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी रखडलेल्या या मार्गाला गेल्या सात वर्षात गती मिळाली. राज्याने देखील या कामाच्या निधीत वाटा उचलला.