मुक्तपीठ टीम
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती (मुंबै) सहकारी बँकेतील गैरव्यवहारांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बँकेच्या गेल्या पाच वर्षातील कारभाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहकार कायद्याच्या कलम ८३ नुसार तीन महिन्यांत चौकशी अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश विभागीय सहनिबंधकांनी दिले आहेत. यामुळे प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
या मुद्द्यांवर होणार चौकशी
मुंबै बँकेच्या कारभाराबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सहकार विभागाने बँकेचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.
- बँकेने शासनाच्या हमीवर साखर कारखान्यांना दिलेले कर्ज
- बँकेने दिलेल्या कॉर्पोरेट कर्ज खात्यांची चौकशी
- गृहनिर्माण संस्थांना स्वयंपुर्नविकास धोरणांतर्गत दिलेल्या कर्जाची चौकशी
- बँकेचे मुख्यालय व शाखांच्या दुरुस्तीवर झालेला खर्च
- मागील पाच वर्षात संगणकीय प्रणाली अद्ययावत करणे, संगणक खरेदी यासाठी केलेल्या खर्चाची चौकशी
- भांडवलात घट होऊन ते ७.११ टक्के कसे झाले, या सर्व प्रकरणात मुंबई बँकेची चौकशीचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.
- उपविधीत नमूद केलेल्या आणि रिझर्व्ह बँकेने मान्य केलेल्या कार्यक्षेत्राचे उल्लंघन करून बँके ने दिलेली आणि थकीत कर्जे
- पाच वर्षांतील अनुत्पादीत वर्गवारीतील तसेच गैरव्यवहारातील सोने तारण कर्ज
- मजूर सहकारी संस्थांना वाटप केलेल्या थकीत कर्जाबाबत
- बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहनिर्माण संस्थांना दिलेले कर्ज आदी मुद्देही चौकशीच्या केंद्रस्थानी असतील.
चौकशी अधिकाऱ्यांनी या सर्व मुद्यांवर आधारित सखोल चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल द्यावा असे, आदेश विभागीय सहनिबंधकांनी दिले आहेत.
केवळ द्वेषाचं राजकारण करायचं म्हणून मुंबै बँकेची चौकशी
- राज्य सरकारच्या या निर्णयानंतर प्रवीण दरेकर आक्रमक झाले आहेत.
- गुरुवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
- यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
- मुंबै जिल्हा बँकेला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार पण आता राष्ट्रवादीने देखील पुढच्या सामन्याला तयार रहावं.
- कारण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सगळ्या जिल्हा बँकांच्याविरोधात मी ईडी, सीबीआय आणि केंद्र सरकारकडे तक्रार करणार.
- ही एकट्या प्रवीण दरेकरांची बँक नाहीय.
- यात राष्ट्रवादीचे ६ संचालक आहेत.
- यामध्ये शिवाजीराव नलावडे, अजितदादांच्या जवळचे सहकारी सिद्धार्थ कांबळे या बॅंकेत आहेत.
- तसंच सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर हे देखील आहेत. मग कारवाई झाली तर केवळ प्रवीण दरेकरांविरोधात होणार नाही.
तशी सुतराम शक्यतानाही नाही. - पण केवळ द्वेषाचं राजकारण करायचं म्हणून मुंबै बँकेची चौकशी सुरु केलेली आहे.
प्रवीण दरेकरांचा इशारा
- पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाघोटाळा आहे. राज्य सरकारने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी करावी.
- सहकाराच्या माध्यमातून जे घोटाळेबाज आहेत, त्यांचे देखील घोटाळे येत्या काळात मी आता उघड करणार आहे.
- सरकारने बँकेची चौकशी लावून एक बोट मुंबै बँकेकडे केले आहे, पण त्याचवेळी राष्ट्रवादीने हे पण लक्षा ठेवावे की, एक बोट आमच्याकडे करताना तुमच्याकडे चार बोटं आहेत.
- प्रवीण दरेकरचा आता एककलमी कार्यक्रम, सहकारातील घोटाळे बाहेर काढणार.