मुक्तपीठ टीम
राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष आणि लोकशाहीर लीलाधर हेगडे यांची अभिवादन सभा रविवारी संध्याकाळी राष्ट्र सेवा दल,मुंबईच्या वतीने गोरेगावच्या दळवी सभागृहात घेण्यात आली.
३० ऑक्टोबर रोजी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते.राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाच्या माध्यमातून महाराष्ट्र दर्शन,भारत दर्शन, आझादी की जंग असे कार्यक्रम केले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी झालेल्या आंदोलनात साने गुरुजी सोबत ते फिरले.संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी योगदान दिले.
लिलाधर हेगडे यांनी गायलेली गाणी,सादर केलेले पोवाडे,नृत्य आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अभिवाचन या सांगीतिक माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आले.
नुकतेच विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत, आज स्मृतीदिन असलेले हुतात्मा बाबू गेनू आणि लीलाधर हेगडे यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते आणि कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांनी ‘चर्चा सत्रात अडकलेली म्हातारी’ ही कथा वाचून दाखवली.आकाशवाणीच्या निवेदिका सुलभा सौमित्र यांनी लीलाधर हेगडे यांच्या पुस्तकाला पु. ल.देशपांडे आणि विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग वाचून दाखविला.जेष्ठ अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी हेगडे यांनी आवाबेन देशपांडे यांना लिहिलेल्या पत्राचे वाचन केले. लोककलाचे अभ्यासक शाहीर गणेश चंदनशिवे यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आणि आपल्या पहाडी आवाजाने पोवाडा सादर करून त्यांना आदरांजली वाहिली. शाहीर दत्ता म्हात्रे यांनी ‘स्वातंत्र्याचा जयजयकार’ हे गाणे सादर केले.
मंदा हेगडे यांनी ‘देह मंदिर,चित्त मंदिर एकतेची प्रार्थना’ हे गाणे सादर केले आणि त्यावर झेलम परांजपे आणि अंकुर बल्लाळ यांनी नृत्य सादर केले. बंकीम यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आणि भाई कोतवाल यांच्यावरचा एक पोवाडा सादर केला.लीलाधर हेगडे यांच्या ऑडियोच्या आवाजातील एका कोळी नृत्यावर सुहिता थत्ते, अरुणा जोगळेकर,झेलम परांजपे,अंकुर बल्लाळ,रोहन डहाळे,अभय दाणी यांनी नृत्य सादर केले.मालवणी,मालाड केंद्राच्या सेवादल सैनिकांनी ‘बिजली नाचेल गगनात, वादळ होईल जोशात ‘ या गाण्यावर रॅप नृत्य केले.सुदाम वाघमारे, कृपेश कांबळे,रोहन डहाळे यांनी संगीताची बाजू सांभाळली,अंकुर बल्लाळ,अभय दाणी,दिपाली टिकम,रुपाली कदम,अपर्णा देवधर यांनी साथ केली.
जेष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी लीलाधर हेगडे यांच्या आठवणी जागवत,वसंत बापट यांनी लीलाधर हेगडे यांच्यावर लिहिलेल्या कवितेचे वाचन केले आणि कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले.राष्ट्र सेवा दल मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले.तर कृपेश कांबळे यांनी आभार मानले.दोन तास चाललेल्या या अभिवादन सभेची सांगता शाहीर दत्ता म्हात्रे यांनी ‘वल्हवा रे वल्हवा रे वल्हवा रे नाव ‘ या गाण्याने केली.