मुक्तपीठ टीम
भाजपाविरोधात मजबुतीनं उभं राहण्याचा प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला घराणेशाही त्रासदायक ठरत आहे. पक्ष संकटात असला तरी पदाच्या मोहापायी दुहीचा धोका पत्करला जात आहे. मुंबई युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सुरज ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा राहुल गांधींकडे सादर केला आहे. गेली अनेक वर्षे एनएसयूआय आणि युवक काँग्रेसमध्ये कार्यरत असतानाही केवळ एका माजी आमदाराच्या आजी आमदार मुलाला युवक काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाल्यानं त्यांनी अस्वस्थता व्यक्त केली आहे. बाबा सिद्दीकींचा मुलगा असल्याने आमदार झिशान सिद्दीकीसारख्या अननुभवी माणसासोबत काम करणे शक्य नसल्याचे सांगत सूरज ठाकूर यांनी राजीनामा दिला आहे.
प्रिती गांधींचा काँग्रेसला टोला
भाजपाच्या सोशल मीडियातील योद्ध्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रिती गांधी यांनी ट्विटरवर काँग्रेसला चांगलाच टोला लगावला आहे. काँग्रेस नेते सूरज ठाकूर यांनी सक्षम नसणाऱ्या घराणेशाहीच्या वारसदाराविरोधात राजीनामा दिला आहे, पण तो राजीनामा त्यांनी तशाच सक्षम नसणाऱ्या घराणेशाहीच्या वारसदाराकडे सोपवला आहे.
Congress leader @SurajThakurINC has resigned from his post of working president of Mumbai Youth Congress because he believes an “incapable dynast”, Zeeshan Siddiqui was chosen over him as President.
Ironically, he was addressing his grievance with another incapable dynast!! pic.twitter.com/DaaVg0XKYX
— Priti Gandhi – प्रीति गांधी (@MrsGandhi) August 25, 2021
सूरज सिंह ठाकूर यांचे राजीनामा पत्र
विषय: मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा
आदरणीय श्री. राहुल गांधी जी,
मी गेल्या १४ वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. माझी पार्श्वभूमी ही मध्यमवर्गीय कुटुंबाची आहे.
मी मुंबईत वाढलो. मी २००७मध्ये माझ्या महाविद्यालयीन दिवसात एनएसयूआयचा सदस्य म्हणून काँग्रेस पक्षात सामील झालो. कठोर परिश्रम आणि अनेक वर्षे समर्पित वृत्तीनं काम करत आहे. तुम्ही आणि तुमच्या क्रांतिकारी विचारांमुळे एनएसयूचा मुंबई अध्यक्ष म्हणून २०१० मध्ये निवडला गेलो. त्यानंतर पु्न्हा २०१२ मध्ये निवड झाली. २०१७पासून मी मुंबई युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणूनही काम करत आहे.
आपण एनएसयूआय आणि युवक काँग्रेसमध्ये आणलेल्या क्रांतिकारी बदलांच्या परिणामामुळेच हे शक्य झाले आहे. निवडणूक प्रक्रियेद्वारे माझ्यासारख्या व्यक्तीला, सामान्य मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून नेतृत्वाची संधी मिळाली.
तुमच्या क्रांतिकारी दृष्टीने प्रेरित होऊन श्री राहुल जी. मी पक्षासाठी माझा घाम गाळला. प्रसंगी रक्त सांडत लढा दिला आहे.
गेली १४ वर्षे मी एक सच्चा काँग्रेस सैनिक म्हणून काम केले. तसेच करतही राहीन. गेल्या १४ वर्षांपासून काळजी न घेता, ऊन-पावसाची पर्वा न करता, मी आंदोलने आणि धरणे या मार्गानं लढत राहिलो. अटक होत राहिलो.
देशभरातील कार्यकर्ते पक्षाचे आयुष्य देतात. मीही देत राहिलो. पण आता मी थोडा निराश झालो. कारण माझे कार्य आणि समर्पण बाजूला फेकले गेले आहे आणि इतर गोष्टींना महत्व मिळाले आहे. माझा राजीनामा माझा आत्मसन्मान आणि कार्यकर्त्यांसाठी आहे. मध्यमवर्गातून आलेल्या लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांपैकी मी एक आहे आणि राहणार आहे.
एक काँग्रेस कार्यकर्ता आणि तुमचा एक निष्ठावान सैनिक म्हणून तुम्ही माझी प्रेरणा आहात आणि मी योद्धा म्हणून तेच शिकलो आहे.
तुम्ही एका सामान्य कार्यकर्त्याची निराशा समजून घ्याल. ज्याला लायकी असतानाही उपेक्षिलं गेलं आहे. त्यांचा विचार केला, ज्यांना माझ्यापेक्षा संघटनेतचा अनुभव कमी आहे.
माझा नेहमीच असा विश्वास होता की, काँग्रेसमध्ये सामान्य कार्यकर्त्यांचा त्याग आणि अनुभवाचा अधिक विचार केला गेला आहे. काँग्रेसमध्ये प्रसिद्धी आणि इतर बाबींना तेवढं महत्व दिलं गेलं नाही. पण अलीकडील निर्णयाने मला खूप निराश केले आहे. आणि मी खूप अस्वस्थ आहे. कॉंग्रेसमध्ये अननुभवी व्यक्तीसोबत काम करणे मला शक्य नाही.
धन्यवाद
तुमचा विश्वासू
सूरजसिंह ठाकूर
जय हिंद!
जय काँग्रेस!