मुंबईच्या गोरेगावातील पत्राचाळ…ही डर्टी स्टोरी 672 बेघर कुटूंबांची… घर गेल्यामुळे कफल्लक झालेल्या हजारो लोकांची. या डर्टी स्टोरीत सर्व आहे. राजकारण, गुन्हेगारी आणि धंदा! पण त्यानेच केला सामान्यांच्या जगण्याचा वांधा!!
पंकज दळवी
पत्राचाळीच्या पुनर्वविकास प्रकल्पाच्या प्रक्रियेला सुरवात झाली ती 2008 मध्ये. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीने पुनर्विकास प्रकल्प हातात घेतला. आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला आणि शेवटचा पुनर्विकास प्रकल्पाचा त्रिपक्षीय करार अस्तित्वात आला. 48 एकरचं इतकं मोठं घबाड हाती लागल्यावर गुरुआशीषच्या संचालकांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्यांनी सबका साथ सबका विकास म्हणत 672 कुटुंबाच्या आयुष्याची माती केली.
गुरूआशिष या कंपनीला एचडीआयएल या कंपनीने विकत घेतलं. प्रवीण राऊत यांनी संपूर्ण कॉलनी रिकामी करण्याचं काम सुरू केलं.
हे तेच प्रवीण राऊत आहेत जे सध्या पीएमसी प्रकरणात चर्चेत आहेत. खरं तर या प्रवीण राउतला फेब्रुवारी महिन्यात पत्राचाळ विषयात अटक करण्यात आली. आणि पत्राचाळ प्रकरणात त्यांच्या बँक खात्याची तपासणी करत असताना वर्षा राऊत कर्ज प्रकरण पुढे आलं. अर्थात पत्राचाळीच्या हजारो अबालवृद्धांचा तळतळाट प्रवीण राऊत यांच्या मागे आहे. त्यामुळे यातून सुटका नाही. आणि होऊसुद्धा देणार नाही.
या कामात म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं सर्वस्व अर्पण करून लोकांना घराबाहेर काढलं. म्हाडानं कलम 95 च्या नोटीस देऊन 48 एकरवर असलेल्या 101 चाळीतील 672 कुटुंबियांना घराबाहेर काढलं. आणि आता रहिवासी बेघर झाल्यावर विकासकासाठी सर्वस्व अर्पण करणारं म्हाडा प्रशासन खाल्या मिठाला जागत गप्प बसलं आहे. जवळजवळ 12 वर्षे येथील लोकांना घर नाही आणि भाडंही नाही. लोकं आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत. पण तरीसुद्धा शासन आणि प्रशासन यांच्याकडून फक्त आश्वासनाशिवाय काहीच हाती लागत नाही.
म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने पत्राचाळीच्या जागेवर टोलेजंग टॉवर उभे राहिले तेथील घरे करोडो रुपयांना विकली. आणि सरकार मात्र यासाठी फक्त समिती बनवणं आणि त्याच्या अहवाल येण्यासाठी महिनोंमहिने मुदत वाढ देणं या पेक्षा अधिक काहीच करत नाही. आता या विषयाची माध्यमं दखल घेत आहेत, राहिवास्यांची संघर्ष समिती खूप मेहनत घेत आहे. तरीसुद्धा हाती काहीच लागत नाही. यासाठी खरंच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.आता हे बघा… अखिल भारतात वेळ काढण्यासाठी ज्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे असे “मला मुदतवाढ द्या” या संघटनेचे वैश्विक अध्यक्ष मा. जॉनी जोसेफ साहेब. माजी आयएएस अधिकारी.
गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2020 ला पत्राचाळीच्या विषयात मार्ग काढण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देऊन मा. वेळकाढू साहेबांची समिती नेमली. मिळालेली एक लोणच्याची फोड साहेबांनी चाखत चाखत वर्षभर चघळली. आणि अर्धा अहवाल दिला तोसुद्धा चोथा झालेला. करायचं काय यासाठी पुन्हा मुदतवाढ मागितली आणि मंत्रालयात बसलेल्या जीन नी “जो हुकूम आका” म्हणत मुदतवाढ दिली. मा. वेळकाढू साहेबांना मी काम करताना बिघितलंय. मुंबई महानगर पालिका आयुक्त असताना मा. वेळकाढू साहेबांचं धडाकेबाज काम पत्रकार म्हणून मी जवळून बघितलंय. असं असताना या माणसाने एक अहवाल द्यायला एक वर्ष लावावं हे मला पटत नाही. स्पष्टपणे सांगायचं तर अहवाल लिहिण्यासाठी लागणारी रिफिल अजुन मंत्रालयातुन आली नाहीये हेच खरं. हा अहवाल आला की निर्णय होईल असं म्हाडाचे अधिकारी सांगतात. सरकार म्हणतं मा. वेळकाढू साहेबांचा अहवाल येऊ देत.
याच्या मुळाशी गेल्यास अहवालास राजकीय इच्छाशक्ती कारणीभूत आहे हे लक्षात येतं. आणि अहवाल देण्याची सरकारची इच्छाशक्ती प्रबळ झाल्याशिवाय हा अहवाल सादर होणार नाही. सध्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी ते मंत्री नसताना अनेकवेळा पत्राचाळीचा विषय विधानसभेत काढत तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांना उत्तर देण्यास भाग पाडलं होतं. मग आता असं अचानक काय झालं की मा मंत्री महोदय यांना पत्राचाळीचा आवाज ऐकू येत नाही. सर्व राजकीय पक्ष सोबत आहेत तरी हाती काहीच नाही. पत्राचाळीच्या विषयात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत संघर्ष समिती कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहे. आता पत्राचाळीच्या विषयात उखळ पांढरे करणाऱ्यांची नावं पुढे येत आहेत. कदाचित आणखी काही मोठी नावं पुढे येतीलही. पण यातून हा विषय सुटणार आहे का? तर नाही…
एकदा शासनाने ठरवलं तर अशक्य असं काही नसतं हे मी पत्रकार म्हणून अनेकवेळा पाहिलंय. या लढ्यात राहिवाश्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहेत ते मा.उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब. देसाईसाहेब अजूनही यातून मार्ग निघावा यासाठी झटणाऱ्या लोकांमध्ये अग्रस्थानी आहेत. ही आमच्यासाठी अजूनही दिलासा देणारी बाबा आहे. एकूणच काय तर मा. वेळकाढू साहेबांच्या माध्यमातून सुरु असलेला पासिंग द पार्सलचा खेळ हा त्यांचा खेळ नसून ते फक्त या खेळातील एक खेळाडू आहेत. ते फक्त अहवाल-अहवाल या खेळातील त्यांची जबाबदारी निभावत आहेत. त्यामुळे देवाजीच्या मनात आल्याशिवाय पार्सल एका ठिकाणी थांबणार नाही हे नक्की. आता हे देवाजी कोण हे तुम्हीच ठरवा
- (पंकज दळवी हे पत्रकार असून आणि पत्रा चाळ संघर्ष समितीचे सदस्यही आहेत. स्थानिक रहिवाशांसाठी सातत्यानं ते विधायक मार्गानं संघर्ष करतात)