मुक्तपीठ टीम
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रेमडेसिविरचा पुरवठा वाढवल्याबद्दल मुंबईकरांच्यावतीने पंतप्रधानांना धन्यवाद दिले. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप सकारात्मक दृष्टिकोनाचे असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावाचे असल्याचीही आठवण करून दिली. राज्यातील स्थानिक भाजपा नेते ठाकरे सरकारवर आक्रमकरीत्या चढाई करत असताना मुख्यमंत्री आणि महापौरांनी केंद्रातील भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांबद्दलची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले आहेत. त्यातील मोठा भाग मुंबईसाठीही मिळणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. त्याबद्दल विचारले असता महापौर किशोर पेडणेकर यांनी पुढील भाष्य केले:
मोदी – ठाकरेंचे भावाचे नाते
- आभार आपली संस्कृती आहे. आपण भारतीय संस्कृतीत आहोत.
- जे जे चांगलं केलं आहे पंतप्रधानांनी, ते नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून काम करतात त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून आभार.
- त्यांनी रेमडेसिविरचा जास्त साठा महाराष्ट्राला दिला आहे. त्यामुळे मुंबईची महापौर म्हणून मी आभार मानते.
- असेच सहकार्य एकमेकांना राहायला हवं आणि राहिल.
- कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाते हे सर्वांनाच माहिती आहे, काय नातं आहे, जेव्हा बाळासाहेबांच्या बरोबर मोदीसाहेब जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी एकमेकांना भावाचे नाते आहे म्हटले. आजही मोदीसाहेब म्हणतात. आणि उद्धवजीही एक माझा भाऊ आहे, अशा नात्याने वागतात.
- अशा चांगल्या कम्युनिकेशनमधून मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रासाठी चांगले होईल.
नातं घट्ट करणारे रेमडेसिविर!
- राज्यात रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.
- केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
- हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे.