मुक्तपीठ टीम
सरकारी काम सहा महिने थांब, असं आपल्याकडे म्हणतात. पण राज्याचा कारभारात महत्वाचे स्थान असणाऱ्या आमदारांच्या आमदार निवासाच्या बांधकामासाठी तर ‘थांबच थांब’ सुरु आहे. सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भूमिपूजन झालेल्या मनोरा आमदार निवासाच्या नव्या वास्तूच्या बांधकामाला आता मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना सुरुवात होणार आहे.
९०० कोटींचा प्रकल्प!
मनोरा आमदार निवास पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे. तीन कंपन्यांनी पुनर्विकासासाठी उत्सुकता दर्शविली आहे. बांधकाम क्षेत्रातील दिग्गज टाटा, एल अँड टी आणि शापूरजी पालनजी या तीन कंपन्यांपैकी एका कंपनीला कंत्राट देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुढच्या वर्षी या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.
उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर अंतिम कंत्राट दिलं जाणार
- मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना नव्या मनोरा आमदार निवासाचे भूमीपूजन २०१९ साली जुलै महिन्यात करण्यात आले.
- मात्र त्यानंतर या कामाचे पुढे काहीच झाले नाही.
- आमदारांना मुंबईत राहण्यासाठी सरकारी खर्च मिळत असल्याने त्यांनाही कार्यकर्त्यांना उपयोगी पडणाऱ्या या सुविधेची आठवण राहिली नसावी.
- कोरोना संकटात तर या कामाचा कुणी पाठपुरावाही क्वचितच केला असावा.
- त्यामुळे दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही या नव्या मनोरा आमदार निवसाचे काम अद्याप सुरु झालेले नाही.
- या कामासाठी टाटा , शापूरजी पालनजी आणि एल अँड टी या कंपन्यांनी निविदा भरलेल्या आहेत.
- उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर अंतिम कंत्राटदार ठरवला जाईल.
- त्यानंतर मनोरा आमदार निवासाच्या प्रस्तावित इमारतीचे बांधकाम सुरु होईल.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते #मनोरा आमदार निवास इमारतीचे भूमिपूजन. सभापती रामराजे निंबाळकर, अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील विनोद तावडे, महादेव जानकर, सुरेश खाडे, राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार आदी उपस्थित pic.twitter.com/L6mi53u1nQ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 24, 2019
नवा मनोरा आमदार निवास…आमदारांसाठी भव्य अशी सर्वसुविधायुक्त वास्तू!
- मनोरा या नव्या आमदार निवासात तब्बल ८०० खोल्या असणार आहेत.
- ही एक ३४ मजली इमारत असेल.
- नव्या इमारतीचे एकूण बांधकाम ७ लाख ७२ हजार चौरस फुटांचे असेल.
- नव्या इमारतीत एक मोठे सभागृहही असेल.
- सभागृहाची आसन क्षमता ही २४० असेल.
- ही इमारत सर्व सोयीसुविधांनी युक्त असून याठिकाणी वाहनतळ, दवाखाना, दुकाने, भोजन कक्ष यांची व्यवस्था असेल.
- या नव्या इमारतीत चित्रपटगृह, वाचनालयदेखील असेल.